दिल्ली प्रमाणे नगर मध्येही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, १० एप्रिलला लोकार्पण


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या पुतळ्याच्या धर्तीवर नगर मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करण्यात आला असून त्याचे लोकार्पण केंद्रिय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते १० एप्रिल रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास महायुती व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शहरात डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी आंबेडकरवादी नेते व कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मागणी करत पाठपुरावा केला होता. त्यास यश येऊन महापालिकेच्या माध्यमातुन मार्केट यार्ड चौकात पूर्वी असलेल्या अर्धाकृती पूतळ्याच्या जागी हा नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सुशोभिकरण करून १८ फूट उंचीचा चौथारा उभारण्यात आला आहे. त्या चौथार्‍यावर १० फूट उंचीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. हा पुतळा दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या पुतळ्या प्रमाणे पूर्णाकृती तयार करण्यात आलेला आहे. असा पुतळा दिल्ली नंतर अहिल्यानगर शहरात असणार आहे. 

यावेळी बोलतांना आमदार जगताप म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होत आहे. पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यात मदत होईल. यावेळी संभाजी भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुेध गायकवाड, रोहित आव्हाड, किरण दाभाडे, सुनिल क्षेत्रे, कौशल गायकवाड, सुनिल शिंदे, प्रा. जयंत गायकवाड, विशाल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, संजय जगताप, सिद्धार्थ आढाव, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, विजय गायकवाड, गौतमी भिंगारदिवे आदी उपस्थित होते. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी मुख्यत: ब्रांझ धातुचा उपयोग करण्यात आला आहे. ब्रांझ धातु बरोबरच अन्य पाच धातुचे मिश्रण या पुतळ्यासाठी उपयोगी आणले आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचे वजन ८०० किलो असून पूर्ण फिटींग होईपर्यंत ते एक टनापर्यंत पोहचेल. या पुतळ्याचे शिल्पकार कोंढवा हवेली, पुणे येथील ऋषी आर्ट असून, पुतळ्यासाठी १६ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च आला आहे तर चौथरा उभारणीसाठी ५५ लाख ७६ हजार २१७ रुपये खर्च आला आहे.

0/Post a Comment/Comments