नगर - सामायिक शेतीच्या वादातून नगर तालुक्यातील अकोळनेर येथे दोन कुटुंबात ९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास तुफान हाणामारी झाली. यावेळी लोखंडी सळई, तलवारीने वार करण्यात आले. या हाणामारीत ३ जण जखमी झाले असून दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादी वरून ११ जणांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत योगेश सुभाष शेळके (वय ३१, रा. अकोळनेर ता.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अशोक हनुमंत शेळके, विशाल विलास शेळके, अमोल अशोक शेळके, विलास हनुमंत शेळके, भारती उर्फ भीमा अशोक शेळके, आणि संजना विलास शेळके हे फिर्यादी योगेश शेळके याचे चुलते, चुलती व आई यांच्याशी भांडण करीत असताना योगेश याने तुम्ही का भांडण करता असे विचारले असता त्याच्या आईने सांगितले की आपल्या जागेत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचे सामान आणून ठेवले आहे. त्यावेळी योगेश याने तुमचा ट्रॅक्टर येथून काढून घ्या असे सांगितले. याचा राग आल्याने सहा जणांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
यातील विशाल शेळके याने लोखंडी सळईने फिर्यादी योगेश याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. त्यानंतर विलास शेळके हा तेथे आला व त्याने शिवीगाळ करीत लाथा बुक्क्याने मारहाण केली. आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत योगेश शेळके व त्याची आई मिना शेळके हे जखमी झाले. याप्रकरणी योगेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाण्यात ८ जणांच्या विरुद्ध भा. न्या. सं. २०२३ चे कलम ११५ (२), ११८ (१), ३५२, ३५१(२) (३), १८९ (२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या गटाच्या वतीने विशाल विलास शेळके (वय २१, रा. अकोळनेर, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे चुलते अशोक शेळके यांचा रघुनाथ शेळके, सुभाष शेळके व रोहिदास शेळके यांच्यामध्ये सामायिक शेतीच्या कारणावरुन वाद सुरु होता. त्यामुळे विशाल शेळके हे भांडण सोडवण्याकरिता मध्ये गेले असता प्रतीक शेळके, प्रशांत शेळके व योगेश शेळके हे विशाल याच्या अंगावर धावून आले व प्रतीक शेळके याने त्याच्याकडे असलेल्या लोखंडी तलवारीने विशाल याच्या डोक्यात उजव्या बाजूला वार करुन त्यास जखमी केले.
याप्रकरणी विशाल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भा. न्या. सं. २०२३ चे कलम ११८ (१), भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment