अहिल्यानगर - केडगाव मध्ये मित्राच्या घरात झोपलेल्या १६ वर्षीय युवकाला १२ जणांच्या टोळक्याने घराचा दरवाजा तोडून बळजबरीने उचलून स्कॉर्पिओ गाडीत बसवून केडगाव बायपास रोडवर नेप्ती मार्केट शेजारील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्याला मारहाण करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचा कापडी पंचाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १४ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे या अत्याचाराचे आणि मारहाणीचे व्हिडीओ या आरोपींनी त्यांच्या मोबाईल मध्ये काढले.
बीड च्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखा प्रकार केडगाव मध्ये घडला आहे. मात्र या जीवघेण्या हल्ल्यातून सदर युवक सुदैवाने वाचला आहे. त्याने १७ एप्रिल रोजी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून केडगाव उपनगरातील एकनाथनगर येथील रावण साम्राज्य ग्रुपचा अध्यक्ष मयूर अनिल आगे, अबुजर राजे, शाहरुख अन्सार पठाण, आदित्य प्रशांत सोनवणे, अजय किशोर शिंदे, ओमकार उर्फ भैया राहिंज, रोहीत पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते, रोहीत कोल्हे, अतिफ शेख, सौरभ गायकवाड (सर्व रा. केडगाव) यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण, अनैसर्गिक अत्याचार, पोक्सो, मारहाण अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी युवक हा १४ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक संपल्यावर त्याच्या मित्राच्या नेप्ती रोडवरील घरी गेला होता. रात्री ११.३० च्या सुमारास सर्व आरोपींचे टोळके स्कॉर्पिओ व मोटारसायकल वर तेथे आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून फिर्यादी, त्याचा मित्र व त्याच्या वडिलांना मारहाण केली. फिर्यादी युवकाला घराबाहेर रस्त्यावर ओढत आणून मारहाण करत त्याला व मित्राला स्कॉर्पिओ मध्ये बसविले. त्याला घेवून केडगाव बायपास रोडवर नेप्ती मार्केट शेजारील मोकळ्या जागेत नेले. काही वेळात तेथे मोटार सायकल वर काहीजण आले.
त्यातील एकाने याला मारण्याअगोदर त्याचा व्हिडीओ काढू असे म्हणत फिर्यादीला बळजबरी करत बोलायला लावले की, ओमकार राहिंज यांची टपरी आम्ही फोडली व मित्राच्या घरी लपून बसलो होतो. असा व्हिडीओ काढून झाल्यावर मयूर आगे याने फिर्यादीला कपडे काढायला लावले. त्यास नकार देताच ओमकार राहिंज याने त्याच्या गळ्याला कोयता लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरून फिर्यादीने कपडे काढल्यावर त्यातील ३ -४ जणांनी फिर्यादी वर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यांच्या इतर साथीदारांनी या सर्व प्रकारचे व्हिडीओ शुटींग केले.
मेल्याचा समज झाल्याने आरोपी निघून गेले
त्यानंतर अजय शिंदे म्हणाला की याला आता जिवंत सोडता कामा नये, असे म्हणत त्याने फिर्यादी वर कोयत्याने वार केला, मात्र तो चुकला. त्यावेळी एकजण म्हणाला अरे याला कोयत्याने मारले तर आपल्याला पोलिस लगेच पकडतील, त्यामुळे याचा गळा आवळून मारू असे म्हणताच २-३ जण पुढे आले, त्यांनी कापडी पंचाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी बेशुद्ध पडल्यावर तो मेला असा समज झाल्याने आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर १५ एप्रिल रोजी सकाळी ६ च्या सुमारास फिर्यादी युवक शुद्धीत आला. त्याने आपले कपडे घातले आणि घरी गेला. त्याच्या आईने त्याला काय झाले असे विचारले, परंतु झालेल्या अत्याचाराने आणि मारहाणीमुळे सदर युवक घाबरून गेला होता. २ दिवसांनी या धक्क्यातून सावरल्यावर त्याने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तो आई समवेत १७ एप्रिल रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आला. त्याच्या फिर्यादी वरून पोलिसांनी १२ जणांवर बी.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), १४० (१), ९६, ११८ (१), ११५ (२), ३५१ (३), ३५२, १८९ (२) (४) (९), १९१ (१) (२), ३२४, ३३३ सह बालकांचे लैगिंक अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२, १७ प्रमाणे गुन्हा दाखल केला.अधिक तपास स.पो.नि कुणाल सपकाळे हे करीत आहे.गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment