नगरमध्ये झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात गेलेल्या तरुणीसोबत घडला भयानक प्रकार


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - झेरॉक्स दुकानदाराने ब्लूटूथच्या साह्याने झेरॉक्स काढण्याच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा मोबाईल घेऊन तिच्या मोबाईल मधील फोटो घेऊन इंस्टाग्राम अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्यावर छुपी नजर ठेवत गैरवर्तन केल्याची घटना नगर रेल्वे स्टेशन रोडवरील पंचायत समिती कार्यालयासमोरील सुपर फाईन झेरॉक्स दुकान येथे ११ एप्रिल रोजी दुपारी घडली.

याबाबत पिडीत तरुणीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी केडगाव उपनगरातील रहिवाशी असून ती स्टेशन रोडवरील सुपरफाइन झेरॉक्स दुकानात रेशन कार्डची झेरॉक्स काढण्याकरिता गेली होती. त्यावेळी दुकानातील तरुणाने त्याचे मोबाईलवर पीडीएफ पाठवण्यास सांगितले. त्यावर त्या तरुणीने मोबाईलवर पीडीएफ पाठवली असता त्याने पीडीएफ वरुन झेरॉक्स निघत नाही असे सांगून ब्लूटूथने डॉक्युमेंट शेअर करा असे सांगितले. त्या तरुणीस ब्लूटूथने डॉक्युमेंट शेअर करता येत नसल्याने दुकानातील तरुणाने तिच्याकडून तिचा मोबाईल घेतला व दहा पंधरा मिनिटे जवळ ठेवला. त्यानंतर थोड्यावेळाने तिला तिचा मोबाईल व रेशन कार्डची झेरॉक्स दिली.

तरुणी तेथून निघून गेल्यानंतर थोड्यावेळात तिने मोबाईल चेक केला असता मोबाईल मधून तिचे फोटो सेंड होताना दिसले. व सर्व फोटो सक्सेसफुली सेंड असे नोटिफिकेशन आले. तसेच तिच्या इंस्टाग्राम आयडी वरून तिच्या संमतीशिवाय अर्शद सय्यद.१५ या इंस्टाग्राम अकाउंट वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे दिसले.तिने रिक्वेस्ट पाहिल्यावर अकाउंटच्या प्रोफाईलला तरुणाचा फोटो दिसला. त्यावेळी तिच्या लक्षात आले की झेरॉक्स दुकानातील तरुणाने ब्लूटूथच्या साह्याने झेरॉक्स काढून देण्याच्या बहाण्याने तिचा मोबाईल घेतला व तिच्या मोबाईल मधील तिचे फोटो स्वतःच्या मोबाईल मध्ये टाकून घेतले व तिची संमती नसताना तिचे मोबाईल मधील इंस्टाग्राम अकाउंट आयडी बघून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

अशा रीतीने तिच्यावर छुपी नजर ठेवली. याबाबत त्या तरुणीने तिच्या नातेवाईकांना सर्व सांगितले. तिच्या नातेवाईकांनी झेरॉक्स दुकानात जाऊन चौकशी केली असता त्या तरुणाचे नाव अर्शद नाज हसन सय्यद (वय २६ रा. सावजी थ्रेड जवळ, आशा टॉकीज चौक) असे असल्याचे समजले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पिडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन अर्शद सय्यद याचे विरुद्ध भा. न्या. सं. २०२३ चे कलम ७८ (२) प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments