संत तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचे ध्वजारोहण व मंडप उभारणीचा शुभारंभ


नगर तालुका (प्रतिनिधी) - जगतगुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा १५ एप्रिल ते २३ या कालावधीत नगर तालुक्यातील अकोळनेर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्याचे ध्वजारोह व मंडप उभारणीचा शुभारंभ ३१ मार्च रोजी सायंकाळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, ह.भ.प माऊली महाराज कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

अकोळनेर ( ता. अहिल्यानगर ) येथे १५ एप्रिल ते ३ एप्रिल दरम्यान येथे जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन सरपंच प्रतिक शेळके व ग्रामस्थांनी केले आहे. हा सोहळा श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, आष्टी या तालुक्यांच्या सहभागातून पार पडत आहे. या सोहळ्यात ५ हजार गाथा वाचक, ५०० टाळकरी, २५ मृदंग वादक, ५०० गावांचा तुकाराम महाराज अखंड पहारा, एक लक्ष भाविकास पुरणपोळी महाप्रसाद, १०८ युवकांच्या हस्तेच श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र अकोळनेर ज्ञानज्योत आगमन, आठ दिवस जगद्गुरु तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शन असे  आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमास हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज, हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर, हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत, हरिभक्त परायण महंत भास्करगिरी महाराज, हरिभक्त परायण कान्होबा महाराज देहूकर, हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर, हरिभक्त परायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हरिभक्त परायण जयंत महाराज बोधले, हरिभक्त परायण महाराज ज्ञानेश्वर माऊली कदम या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असलेल्या या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते आहेत. तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अण्णा हजारे व पद्मश्री पोपटराव पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले असल्याचे ज्ञानेश्वर माऊली कदम, सरपंच प्रतिक शेळके  यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments