बीड - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याची माहिती आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी याविषयी तसे संकेत दिलेत. या घटनेची कारागृह प्रशासनाकडून अद्याप पुष्टी झाली नाही. पण यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांच्यासह सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपी सध्या बीड कारागृहात बंदिस्त आहेत. सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास कैद्यांना नाष्टा दिला जात होता. त्यावेळी वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेवर हल्ला झाला. याच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्यांवरून बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे घटनेची पुष्टी
तुरुंग प्रशासनाने अद्याप या घटनेची पुष्टी केली नाही. पण भाजप आमदार सुरेश धस यांनी ही घटना घडल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिलेत. महादेव गित्ते व अक्षय आठवले यांना वाल्मीक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो. वाल्मीक कराडने अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे त्यांच्यात झापडझुपड झाली असेल, असे ते या घटनेची एकप्रकारे पुष्टी करताना म्हणालेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अमरावती किंवा नागपूरच्या तुरुंगात हलवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
4-5 दिवसांपासून सुरू होता तणाव
सूत्रांच्या माहितीनुसार, महादेव गित्ते आणि वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांच्यात गत 4-5 दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांच्यात सातत्याने शाब्दिक चकमक सुरू होती. यामुळे तुरुंग प्रशासनाने कारागृहात पोलिसांची जादा कुमकही मागवली होती. पण आज सकाळी उभयंतांत पुन्हा बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. अक्षय आठवले व महादेव गित्ते हे दोघेही वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेवर धावून गेले. यावेळी वाल्मीक कराडला 3-4 थापडा मारण्यात आल्याची माहिती आहे. गित्ते व आठवले हे तुरुंगात एकाच बराकीत आहेत. तर वाल्मीक कराड दुसऱ्या बराकीत आहेत. सकाळी नाश्त्यानंतर बाहेर आल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती आहे.
Post a Comment