बिबट्याने नव्हे, प्रियकराने तिला पळवले; राहुरीतील ‘त्या’ प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर



राहुरी (प्रतिनिधी) -
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये एका विवाहीत तरुणीला बिबट्याने ओढून नेल्याच्या चर्चेने वन विभागासह प्रशासन कामाला लागले होते. परंतु त्या तरुणीच्या आढळलेल्या वस्तू संशयास्पद दिसल्या. पोलिस प्रशासनाने अखेर त्या विवाहीत तरुणीचा शोध घेत घटनेचा उलगडा केला. घटनेत बिबट्याची बदनामी करणार्‍या ‘त्या’ प्रियकर प्रेयसीला पोलिसांनी नेवासा हद्दीतून ताब्यात घेतले.

राहुरी परिसरात एका विवाहीत तरुणीला बिबट्याने ओढून नेल्याची चर्चा झाली. राहुरी तालुका वन विभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांनी वन विभागाचे तीन पथके आणत रात्रभर सुमारे दोनशे एकर क्षेत्रात बेपत्ता तरुणीचा शोध घेतला. इतकेच नव्हे तर गावातील 300 ते 400 तरुणांनी सलग दोन दिवस परिसरात टेहाळणी करीत शोध मोहिम सुरूच ठेवली. दरम्यान, शोध मोहिम सुरू असताना ठिकठिकाणाच्या अंतरावर तरुणीचे गळ्यातील गंठण, गवत कापण्यासाठी नेलेले कापड, गवत कापणीचा विळा, गवत कापणीवेळी घातलेला शर्ट, मोबाईलीच बॅटरी, मोबाईलचा कवर वेगवेगळ्या ठिकाणावर सापडला. त्यामुळे वन विभागाने संबंधित हल्ला हिंस्त्र प्राण्याचा नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

बिबट्याचा हल्ला झालाच नसल्याचे समजल्यानंतर राहुरी पोलिस प्रशासनाकडे घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान उभे राहिले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात तपास यंत्रणा हाती घेण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके, पोलिस नाईक गणेश सानप, पोहेकॉ विकास वैराळ, सागर नवले, अंबादास गिते यांनी तपासाची चक्रे फिरवली. सायबर पोलिस विभागाचे सचिन धनाड यांनीही प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली. त्या विवाहीत तरुणीला बिबट्याने नव्हे तर प्रियकराने पळवून नेल्याचे समजताच पोलिस प्रशासनाने दोघांचा पत्ता शोधून काढला. नेवासा हद्दीतील प्रवरा संगम परिसरात ते राहत असल्याचे समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी व बिबट्याने ओढून नेल्याचा बनाव करण्यासाठी गंठण, साडीचा तुकडा तसेच इतर साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्याची कबुली दोघांनी दिली. राहुरी पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना बोलाऊन घेत घटनेची सविस्तर माहिती दिली. घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिस प्रशासनासह वन विभागानेही सुटकेचा निश्वास टाकला.

मोबाईल संवादाने तपासाची चक्रे फिरली

त्या प्रेयसीचे प्रियकरासमवेत मोबाईल होत असलेल्या चर्चेची सविस्तर माहिती तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांना मिळाली. पोलिस प्रशासनाने तोच धागा पकडत दोघांचा शोध लावला. दोघांमधील जुन्या मोबाईल संवादाने पोलिस प्रशासनाने घटना घडल्यांनतर दोन दिवसातच सत्य समोर आणले.

0/Post a Comment/Comments