मृतदेहाचे तुकडे करून विहिरीत टाकलेल्या युवकाच्या निर्घृण खुनाचा उलगडा, एक आरोपी एलसीबी कडून जेरबंद

 


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे युवकाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत एका संशयित आरोपीला जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. नाजूक प्रकरणात अडथळा आल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

१२ मार्च रोजी श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोत्यात भरून टाकण्यात आल्याचे आढळले. तपासानंतर स्पष्ट झाले की, मृत व्यक्तीचे मुंडके, दोन्ही हात आणि उजवा पाय धडावेगळे करण्यात आले होते. यासंदर्भात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या अत्यंत गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मिसिंग नोंदींची पडताळणी करून मृत व्यक्तीची ओळख पटवली. मृतदेह हा माऊली सतीश गव्हाणे (वय १९, रा. दाणेवाडी, पो. राजापूर, ता. श्रीगोंदा) याचा असल्याचे निष्पन्न झाले.

रविवारी (दि. १६) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून प्राथमिक तपासात त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाले आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अरुण गांगुर्डे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रमोद जाधव, रोहित मिसाळ, अशोक लिपणे, अमोल कोतकर, मनोज लातुरकर, जालिंदर माने, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे आणि महादेव भांड यांनी केली आहे.

‘नाजूक’ प्रकरणाचा बोभाटा केल्यामुळे झाले हत्याकांड

माऊली गव्हाणे या युवकाने दोन व्यक्तींचे ‘नाजूक’ प्रकरण चव्हाट्यावर आणले म्हणून त्याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन संशयित आरोपी सागर गव्हाणे व त्याच्या साथीदाराने आखला होता. माऊलीने बदनामी केली असल्याचा राग मनात धरून त्याचा अत्यंत निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे मुंडके, दोन्ही हात आणि उजवा पाय धडावेगळे करण्यात आले होते. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कसरत घेत या गुन्ह्याचा छडा लावला. संशयित आरोपी सागर गव्हाणे याला गजाआड करण्यात आले.

0/Post a Comment/Comments