बापरे ...एकाच वेळी तीन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात झाले जेरबंद



राहुरी - मुळा धरणाच्या बॅक वॉटरलगत असलेल्या चिंचाळे शिवारात एक नर व एक मादी, तसेच राहुरी फॅक्टरी-गणेगाव रोडवरील वाणी मळ्यात चार वर्षांचा नर बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. तालुक्याच्या पश्चिम भागात एकाच वेळी तीन बिबटे जेरबंद झाल्याची ही दुसरी घटना आहे.

चिंचाळे शिवारात स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने वन विभागाने रामेश्वर कारभारी आघाव यांच्या शेतात पिंजरा लावला होता. बुधवारी (२६ मार्च) पहाटे चारच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेले बिबट्याचे नर व मादी असे दोन बछडे या पिंजऱ्यात जेरबंद झाली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. दरम्यान, बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास राहुरी फॅक्टरी-गणेगाव रोडवरील आण्णा वाणी यांच्या शेतात लावलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यात चार वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. त्याच्या डरकाळ्या ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत वन अधिकाऱ्यांना खबर दिली. 

वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल लक्ष्मीकांत शेंडगे, वनरक्षक मदन गाडेकर, समाधान शंकर खेमनर, ताराचंद गायकवाड यांनी प्रथम चिंचाळे येथे धाव घेत बिबट्याची दोन्ही पिल्ले, तसेच वाणी मळ्यात जेरबंद झालेल्या बिबट्यास ताब्यात घेतले. त्यांना वन विभागाच्या डिग्रस (ता. राहुरी) येथील नर्सरीत हलवण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे. 

मुळा व प्रवरा नद्यांचे सानिध्य व उसाचे मुबलक क्षेत्र व वास्तव्यास सुरक्षीत जागा, तसेच सहज भक्ष्य मिळत असल्याने ९६ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या गेल्या काही दिवसांत २५० च्या वर गेली आहे. त्यामध्ये मादींची संख्या ५० च्या पुढे असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. वर्षभरात एक मादी चार पिल्लांना जन्म देते. वर्षभरात काही पिल्लांचा नैसर्गिक मृत्यू वगळता बिबट्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. 

गेल्या सहा दिवसांत राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या चार तालुक्यांत चार बिबट्यांचा मृत्यू झाला. बिबट अथवा इतर वन्यजीव जेरबंद अथवा बेशुद्ध करण्याबाबत वन विभागाकडील परवानगीचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल आहेत. मात्र, हे प्रस्ताव लोटक स्वरूपात आहेत. मानवी जिवास धोकादायक ठरल्यास किंवा रोगग्रस्त अथवा अपंग झाल्यास वन्य जीव पकडण्याची परवानगी देता येते. वन्यप्राणी पकडणे अथवा ठार मारण्याबाबतचे निकष वेगळे नाहीत. किमान एका बाबीची पूर्तता होत नाही, तोपर्यंत वन्यप्राणी पकडण्याची परवानगी देता येत नाही.

0/Post a Comment/Comments