गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; ‘या’ तारखेपासून वीज बिल होणार कमी


मुंबई - महाराष्ट्र सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वीजेच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. येत्या एक एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार असून पुढील पाच वर्ष राज्यातील जनतेला स्वस्त दरात वीज मिळणार आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांचे नवीन वीज दर लागू करण्यास आयोगाने शुक्रवारी मध्यरात्री मंजुरी दिली. स्मार्ट मीटर (टीओडी) बसविणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि रात्री बारा ते सकाळी सहापर्यंतच्या वीजवापरास १०-३०टक्के वीजदर सवलत मिळेल, मात्र सायंकाळी पाच ते रात्री १०-१२ वाजेपर्यंतच्या वीजवापरासाठी २० टक्के जादा मोजावे लागतील.

महावितरण व अदानी कंपनीचे वीजदर एक एप्रिलपासून सरासरी १० टक्के, टाटा कंपनीचा १८ टक्के तर बेस्टचा वीजदर ९.८२ टक्के कमी होईल. पुढील पाच वर्षात अपारंपारिक क्षेत्रातील सौर व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत.मात्र कृषी ग्राहकांसाठी औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य ग्राहकांवर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वीजदर कमी होऊन दिलासा मिळणार आहे. 

दरम्यान, राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी निवासी हॉटेल्स, गेस्ट हाऊस आदींना वाणिज्यिक ऐवजी औद्योगिक ग्राहकांच्या श्रेणीत टाकण्यात आले असून त्यांचे वीजबिल लक्षणीय कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. या वीज दराच्या कपातीच्या निर्णयाचा फायदा घरगुती वीज वापरकर्त्यांना अधिक प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments