मुंबई: भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८ धावांची धमाकेदार खेळी केली. भारताला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. या खेळीमधील त्याचा एक षटकार तर १०६ मीटर लांब होता. हार्दिकचा हा सिक्स पाहून विराट कोहली, प्रशिक्षक गौतम गंभीरसह संपूर्ण स्टेडियमध्ये उपस्थित चाहते आनंदाने उड्या मारत होते. या सिक्सनंतर कॅमेरामॅनने एका खास व्यक्तीकडे कॅमेरा वळवला आणि तिची प्रतिक्रियाही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही व्यक्ती म्हणजे मॉडेल, ब्रिटिश गायिका, टीव्ही सेलिब्रिटी आणि पंड्यासोबत जिच्या अफेअरची चर्चा सुरू आहे ती, जस्मिन वालिया. पंड्याच्या दणदणीत सिक्सनंतर तीदेखील आनंद साजरा करताना दिसली.
गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक आणि जस्मिन यांच्या नात्याची चर्चा आहे. ती चॅम्पियन्स ट्रॉफीच्या याआधीच्या सामन्यातही टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आल्याने या चर्चेला अधिकच हवा मिळाली. त्यातच जेव्हा हार्दिक फलंदाजी करतो तेव्हा तिचा उत्साह पाहण्यासारखा असतो. जस्मिनने अशाप्रकारे भारताच्या सामन्यांसाठी उपस्थित राहणं, हे त्यांच्या नात्याची पुष्टी करणारे ठरते आहे.
४ मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात, ४५ व्या षटकात चार डॉट बॉल खेळल्यानंतर, हार्दिक पंड्याने पाचव्या चेंडूवर १०६ मीटर लांब सिक्स मारला आणि भारत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २६५ धावांच्या लक्ष्याच्या आणखी जवळ पोहोचला. हार्दिकने त्याच्या २८ धावांच्या खेळीमध्ये ३ दमदार सिक्स मारले. त्याच्या इनिंगदरम्यान स्टेडियममध्ये बसलेली जस्मिन वालियादेखील आनंदी झालेली. ती व्हीआयपी बॉक्समध्ये स्पॉट झाली होती.
नताशासोबत घटस्फोट आणि जस्मिन-हार्दिकच्या अफेअरची चर्चा
दरम्यान नताशा स्टॅनकोव्हिकसोबतच्या घटस्फोटानंतर लगेचच हार्दिक आणि जास्मिन यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती, असे असले तरी अद्याप दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही. काही महिन्यांपूर्वी या दोघांचे ग्रीसमधील फोटो समोर आलेले. त्यांनी एकत्र फोटो पोस्ट केले नव्हते, पण जास्मिन आणि हार्दिक यांनी पोस्ट केलेल्या वेगवेगळ्या फोटोंमधूनही अनेकांनी अंदाज बांधलेला की ते एकत्र सुट्टी एन्जॉय करत आहेत.
Post a Comment