सोशल मीडियावर जिब्ली आर्टचा महापूर, राजकीय नेते, सिने अभिनेत्यांनाही पडली भुरळ



नवी दिल्ली-पुणे : नेटविश्वामध्ये सध्या ‘जिब्ली इमेज’चा अक्षरशः महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. फेसबुक असो की ‘एक्स’ अथवा ‘इन्स्टा’ सगळीकडेच ‘जिब्ली आर्ट’ चर्चेचा विषय बनला होता. सामान्य नागरिकांपासून ते नेते मंडळी आणि सिनेअभिनेत्यांप्रमाणेच सर्वचजण या इमेज पुरामध्ये अक्षरशः न्हाउन निघाले. ही कमाल केली ‘ओपनएआय’च्या ‘चॅटजीपीटी-४ ओ मॉडेल’च्या इमेज जनरेटरने पण त्यामुळे कॉपीराइटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जाणकार नेटीझन्स आणि कलाजगताने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या आक्रमणावर नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येते. ज्यांनी ‘जिब्ली आर्ट’ला जन्म दिला ते प्रसिद्ध जपानी अॅनिमेटर हायाऊ मियाझाकी यांना कलाक्षेत्रातील ‘एआय’चा हस्तक्षेप मान्य नाही. कधीकाळी ‘एआय’च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कलाकृती म्हणजे हा जीवन आणि मानवी मूल्याचा अवमान असल्याचे रोखठोक मत मांडणाऱ्या मियाझाकी यांच्याच कलेवर आज ‘एआय’ने अतिक्रमण केल्याचे दिसून येते. यानिमित्ताने नेटीझन्समध्ये दोन प्रवाह ठळकपणे पाहायला मिळाले. अनेकांना ही क्रांती वाटू लागली असून काहींनी मात्र कलेचे पावित्र्य जपले जाणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

अशा पद्धतीने केली जाणारी प्रतिमा निर्मिती ही चुकीची असल्याचे त्यांना वाटते. ‘जिब्ली’ हा जपानमधील प्रसिद्ध अॅनिमेशन स्टुडिओ आहे. केवळ जपानच नाही तर जगभरातील अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये त्याचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो. जाहिराती असो अथवा चित्रपट ‘जिब्ली आर्ट्स’ म्हटले की मियाझाकी आणि त्यांच्या स्टुडिओचे नाव समोर येते. आज ‘एआय’च्या माध्यमातून या प्रतिमांची निर्मिती करण्यात आल्यानंतर अनेकजण हरखून गेले खरे पण त्याच्यावर आक्षेप घेणारी मंडळी देखील मोठ्या संख्येने पुढे आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

काय आहे जिब्ली

जिब्ली’ या शब्दाचे मूळ अरबी आहे. त्याचा अर्थ ‘उष्ण वाळवंट’ असा होतो. सुंदर रम्य परिकथांच्या सादरीकरणासाठी घिबली अॅनिमेशनचा वापर केला जातो. लोकांच्या थेट ह्रदयाला स्पर्श करणारी कलाकृती साकार करण्याची जादू या कलेमध्ये आहे. खुद्द मियाझाकी यांचे ‘स्पिरिटेड अवे’ आणि ‘माय नेबर टोटोरो’ हे अॅनिमेशनपट जगभर गाजले होते.

खटला दाखल होणार?

एआय’ने तयार केलेले ‘जिब्ली आर्ट’ हे प्रोफाइल इमेजसाठीचे फक्त फिल्टर आहे त्यातून कलेचे मूल्य कोठेही दिसत नाही अशी भावना काहींनी व्यक्ती केली तर काहींच्या मते ज्यांनी हाय एआय फॉर्मचा वापर करत जिब्ली इमेज तयार केल्या त्या सर्वांवरच खटला भरण्यात यावा. विशेष म्हणजे याच कॉपीराईटच्या मुद्यावरून सध्या जगभर ‘ओपनएआय’च्या विरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) हा पहिला टप्पा आहे. भविष्यात कलेच्या विश्वात आपल्याला मोठी उलथापालथ पाहायला मिळेल त्यामुळे कॉपीराईटचे प्रश्न अधिक जटिल होतील. ‘एआय’ सृजनशीलतेची जागा घेऊ शकत नाही. भविष्यात मुळापासून विचार करणाऱ्यांचे महत्त्व वाढेल. ‘एआय’ फक्त मोठे गुगल आहे. ते आपलाच डेटा घेते त्यावर लवकर प्रतिक्रिया करते आणि तोच डेटा आपल्याला देते.- चंद्रमोहन कुलकर्णी, चित्रकार

एआय’ आता अपरिहार्य आहे, हे आपण मान्य करायला हवे. बदल होत राहणार ते आपण थांबवू शकत नाहीत. अगदी डिस्ने, पिक्सार आणि मांगा स्टाइलच्या बाबतीत देखील असेच झाले होते. कलेच्या निर्मितीमागे एक मोठी प्रेरणा, परिश्रम आणि त्या कलावंताचा वैचारिक प्रवास असतो. ‘एआय’च्या बाबतीत तसे नाही त्यामुळे कॉपीराईटचा आदर ठेवला जाणे गरजेचे आहे.- चारुहास पंडित, व्यंग्यचित्रकार आणि ‘चिंटू’चे निर्माते

0/Post a Comment/Comments