साकळाई उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा, घोड प्रकल्पाच्या फेर जल नियोजनास शासनाची मंजुरी



अहिल्यानगर (प्रतिनिधी) - पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनास राज्याच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी (दि.२१ मार्च) मंजुरी दिली असून या फेर जल नियोजनात प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे साकळाई योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या शासन निर्णयात म्हंटले आहे की, घोड मोठा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत "ऊर्ध्व भीमा" या प्रदेशात आहे. या योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथे घोड नदीवर शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी व अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे वडगाव शिंदोडी या गावांच्या सरहद्दीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम सन १९६५ मध्ये पुर्ण होवून प्रकल्पावर सिंचन सुरू आहे.

घोड प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता २१६.३० द.ल.घ.मी (७.६३ अ.घ.फु.) असून प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा १५४.८० द.ल.घ.मी. (५.४६ अ.घ.फु.) एवढा आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाचा सिंचनाचा पाणीवापर १० अ.घ.फु. एवढा आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाचे अनुषंगाने केंद्रीय जल आयोगास सादर केलेल्यानुसार घोड प्रकल्पासाठीची वार्षिक पाणी वापराची तरतूद ही १०.४० अ. घ. फू. इतकी आहे.

महामंडळाने सादर केल्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३२ गावातील ल.पा तलाव, को.प. बंधारे, साठवण बंधारे भरून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मागणी आहे. त्यामुळे वरील मागणीनुसार सदर क्षेत्रासाठी घोड प्रकल्पांतर्गत धरणाच्या उत्तर-पूर्व दिशेला असणाऱ्या अवर्षण ग्रस्त प्रदेशातील सिंचनासाठी व पिण्यासाठी साकळाई उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे.

घोड प्रकल्पाचा सन २००९-२०२१ या कालावधीतील घोड प्रकल्पाचा वार्षिक महत्तम पाणीवापर ७.९८ अ.घ.फु. इतका असुन नियोजित वार्षिक पाणीवापरापेक्षा (१०.४०-७.९८) २.४२ अ.घ.फु. ने कमी आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत १२००० हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी १.६ अ.घ.फु. पाणी व पिण्यासाठी ०.२ अ.घ.फु. पाणी अशाप्रकारे एकूण १.८ अ.घ.फु. पाणी घोड धरणातून प्रस्तावित करण्यात आले आहे. अशाप्रकारे घोड प्रकल्पाचा आज अखेर महत्तम वार्षिक पाणीवापर व प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाण्याची गरज लक्षात घेता सदर पाणी घोड प्रकल्पाचे अस्तिवातील वार्षिक पाणीवापराच्या तरतुदीतून भागवणे शक्य असल्याचे महामंडळाने सादर केले आहे. 

तथापि प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची तरतूद घोड प्रकल्पाचे अस्तिवातील पाणी नियोजनात नसलेने घोड प्रकल्पाचे फेर जलनियोजन मंजूर करणे विचाराधीन होते. घोड मोठा प्रकल्प, ता. शिरूर, जि. पुणे प्रकल्पाचे पाणी वापराचे फेरनियोजनाबाबत खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

उपरोक्त नमूद बदलानुसार कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी सादर केलेल्या पाणी वापराच्या फेर जलनियोजनास खालील शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

१) घोड प्रकल्पाचे मुळ लाभधारक सिंचनापासून वंचित राहणार नाही, याची संपुर्ण जवाबदारी महामंडळाची राहील.
२) प्रकल्पाचा पाणीवापर कृष्णा पाणी तंटा लवादाने अनुज्ञेय केल्याप्रमाणे कृष्णा खोऱ्याचे जलनियोजनाच्या मर्यादेत राहील, याची दक्षता घेण्यात यावी.
३) शासन निर्णय दि.२३/११/२०१६ अन्वये साकळाई उपसा सिंचन योजनेस सक्षम स्तरावर मान्यता झाल्याशिवाय कोणतेही निविदेबाबत कार्यवाही करण्यात येवू नये. असे या शासन निर्णयात म्हंटले आहे. 


 

0/Post a Comment/Comments