एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची ३ गुंडांकडून गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या


चंदीगड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची पंजाबमध्ये हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पंजाबमधील शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गोळीबारात एका निष्पाप 11 वर्षाच्या मुलालादेखील गोळी लागली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. 

तीन गुंडांनी या जिल्हाप्रमुखाचा खून केल्याची माहिती समोर येत आहे. पण या हत्येमागील नेमकं कारण काय होतं? ते अद्यााप समजू शकलेलं नाही. या घटनेत हत्या करण्यात आलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचं मंगत राय मंगा असं नाव होतं. मंगत यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मुलीने या प्रकरणात न्यायाची मागणी केली आहे. या घटनेची दखल एकनाथ शिंदे घेतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

मंगत राय मंगा हे बऱ्याच काळापासून शिवसेनेत सक्रिय होते. ते गुरुवारी (दि.13) रात्री 10 वाजेच्या सुमारास दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. ते मोगा येथील गिल पॅलेसजवळील डेअरीत गेले होते. तिथे तीन गुंडांनी मंगत यांच्यावर गोळीबार केला.

या गुंडांनी गोळीबार केला तेव्हा मंगत यांचं अचानक त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यामुळे मंगत यांनी तातडीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुंडांची पहिली गोळी चुकवली. ती गोळी तिथे उभ्या असलेल्या एका 11 वर्षाच्या मुलाला लागली. यानंतर मंगत आपली दुचाकी घेऊन तिथून पळून गेले. पण गुंडांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना घेरलं. गुंडांनी मंगत राय मंगा यांच्यावर गोळीबार केला. यानंतर ते पळून गेले.

या गोळीबारात मंगत राय मंगा हे गंभीर जखमी झाले. या गोळीबाराची घटना पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंगत राय मगा आणि 11 वर्षाच्या मुलालाही रुग्णालयात नेलं. पण डॉक्टारांनी मंगत राय मंगा यांना मृत घोषित केलं. तर मुलाला मोगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला डीएसीमध्ये हलवण्यात आलं.

मंगत राय मंगा यांच्या हत्या प्रकरणात आता पोलीस सखोल तपास करत आहेत. आरोपींनी मंगा यांची हत्या का केली? ते अद्याप समजू शकलेलं नाही. मंगत यांच्या मुलीने या घटनेवरुन संताप व्यक्त केला. तिने आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. आपले वडील रात्री 8 वाजता दूध घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण आम्हाला 11 वाजता फोन आला की वडिलांनी गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला, असं मंगत यांच्या मुलीने सांगितलं.

0/Post a Comment/Comments