करुणा शर्माशी अधिकृत लग्न केले नाही: धनंजय मुंडे यांचा कोर्टात युक्तिवाद; मग करुणाच्या मुलांचे आई - वडील कोण? कोर्टाचा सवाल


मुंबई - वांद्रे सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. मुंडे यांनी या आदेशांना माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या वकिलांत जोरदार युक्तिवाद झाला. त्यात मुंडे यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाचे करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न झाले नसल्याचा दावा केला. त्यावर कोर्टाने त्यांना धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासी अधिकृत लग्न केले नाही, तर मुंडे व शर्मा यांच्या दोन मुलांचे आई - वडील कोण? असा उलटप्रश्न केला. त्यामुळे हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे.

माझगाव कोर्टाने या प्रकरणी करुणा शर्मा यांच्या वकिलांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार त्यांनी हे पुरावे सादर करण्यासाठी आपल्याला वाढीव वेळ हवी असल्याचे कोर्टाला सांगितले. त्यानुसार, कोर्टाने त्यांना हे पुरावे पुढील तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश देत प्रकरणाची सुनावणी 5 एप्रिलपर्यंत स्थगित केली.

दोन्ही पक्षांचा एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

आजच्या सुनावणीत धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या वकिलांनी एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही पक्षांनी वेळोवेळी उलटप्रश्न विचारून स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः कोर्टानेही दोन्ही पक्षकारांना वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसण करण्याचा प्रयत्न केला. आजच्या युक्तिवादात मुंडे यांच्या वकिलांनी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृतपणे लग्न केले नसल्याचा दावा केला. त्यावर न्यायाधीशांनी त्यांना मग धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या 2 मुलांचे आई- वडील कोण? असा प्रश्न केला.

मुलांना स्वीकारले, पण त्या माझ्या पत्नी नाहीत -मुंडे

त्यावर मुंडे यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाने त्यांचा स्वीकार केल्याचे नमूद केले. तसेच त्यांच्या आईशी लग्न केले नसल्याचे पुन्हा एकवार सांगितले. त्यानंतर पुन्हा कोर्टाने मुले तुमची आहेत म्हणता, मग करुणा शर्मा त्यांच्या आई नाहीत असे कसे म्हणता? असा सवाल केला. त्यावर मुंडेंचे वकील म्हणाले, धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुलांना स्वीकारले आहे. त्यांना आपले नाव दिले आहे. त्यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालवला याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत नाहीत. त्यांचे संबंध पती-पत्नीसारखे नव्हते. त्यांचे अधिकृत लग्नही झाले नव्हते.

धनंजय मुंडे यांचे एक लग्न झाले आहे. त्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले नाही. धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यात परस्पर संमतीने संबंध प्रस्थापित झाले होते. हे त्यांनी कुठेही लपवून ठेवले नाही. केवळ या दोघांचे लग्न झाले नाही. मुंडे यांच्या वकिलांनी यावेळी करुणा शर्मा या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याची बाबही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. करुणा शर्मा यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाखांच्या आसपास आहे. त्या प्राप्तिकरही भरतात. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी निवडणूकही लढवली. त्यानंतरही त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला, असे ते म्हणाले.

लग्न झाल्याचे पुरावे सादर करा -कोर्ट

या युक्तिवादानंतर करुणा शर्मा यांच्या वकिलांनी धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचे 1998 साली लग्न झाल्याचा दावा केला. मुंडे व करुणा शर्मा यांचे 1998 साली लग्न झाले. या लग्नानंतर त्यांना अपत्यप्राप्ती झाले. त्यांचे एकत्र फोटोही आहेत, असे ते म्हणाले. त्यावर कोर्टाने त्यांना या प्रकरणी तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत? असा सवाल केला. त्यावर आम्ही हे सगळे पुरावे सादर करू, पण आम्हाला वेळ हवा आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर कोर्टाने त्यांना पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 5 एप्रिलपर्यंत स्थगित केली.

 

0/Post a Comment/Comments