दस्त नोंदवण्यासाठी वकिलांकडून ५ हजारांची लाच घेताना दुय्यम निबंधकाला रंगेहाथ पकडले


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - आजच्या दस्ताचे सकाळी तुमच्याशी बोलणे झाले आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या, असे म्हणत श्रीगोंदा येथील एका वकिलांकडून दस्त नोंदवण्यासाठी दुय्यम निबंधकाने ५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुय्यम निबंधक सचिन पांडुरंग खताळ (वय ३८, रा. साईराज अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक १०१, श्रीगोंदा) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी स्वतः व इतर २७ जणांनी श्रीगोंदा येथील गट नंबर ११७१ मधील ५ हेक्टर ६८ आर क्षेत्रापैकी २८ आर जमीन विकत घेतली होती. त्याचा दस्त २८ फेब्रुवारी रोजी केलेला होता. त्यानंतर २६ मार्च रोजी तक्रारदार तसेच त्यांचे भागीदार यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक ११७१ मधील २० आर क्षेत्रापैकी त्यांच्या भागीदाराच्या अविभाज्य हिस्स्याचे पूर्ण विक्रीचे १ आर क्षेत्र दुसऱ्यांना ५० हजार रुपयांना विक्री केल्याचा दस्त नोंदविण्याकरता तक्रारदाराकडे दिला होता. 

तक्रारदाराने सदरचा दस्त दुय्यम निबंधक खताळ यांच्याकडे दिला. खताळ यांनी आजच्या दस्ताचे ५ हजार रुपये व २८ फेब्रुवारी रोजी नोंदविलेल्या दस्ताचे १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती. लाच मागणी पडताळणी करण्यात आली. यात सचिन पांडुरंग खताळ यांनी तुमच्या २८ फेब्रुवारी रोजी दस्ताचे पैसे तुमचे पार्टनर देतील, आजच्या दस्ताचे सकाळी तुमच्याशी बोलणे झाले आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या, असे म्हणून लाचेची मागणी केली. त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा येथे खताळ यांना  लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

0/Post a Comment/Comments