नगरमध्ये पोलिसांनी काढली गुन्हेगारांची बेड्या घालून रस्त्यावरून धिंड


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - बुरूडगाव रोड वरील साईनगर येथील योगेश चंगेडीया यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर कोतवाली पोलिसांनी २६ मार्च ला सायंकाळी या गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींना बेड्या घालून काटवन खंडोबा परिसर व बुरूडगाव रोड परिसरात रस्त्यावरून फिरवले. त्यांच्या घरांची झाडाझडती घेत नातेवाईकांकडे चौकशी केली. 

साईनगर येथे २२ मार्च रोजी मध्यरात्री योगेश श्रीकांत चंगेडीया यांच्या घराचे खिडकीचे शटर कटरच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी (रा. अहिल्यानगर) याने साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी (वय २५, रा.संजयनगर, काटवन खंडोबा रोड, अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. तसेच गोपाल राजू नायडू (वय ३४, रा.संजयनगर, काटवन खंडोबा रोड, अहिल्यानगर), सोनू शरद शिंदे (वय २९, रा.भोसले आखाडा, अहिल्यानगर), सोनूसिंग रणजितसिंग जुन्नी (वय २१), सतनामसिंग जीतसिंग जुन्नी (वय २३, दोघे रा.संजयनगर, काटवन खंडोबा रोड, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली इको गाडी जाधव पेट्रोलपंप येथून चोरी केल्याचे आरोपींनी तपासात सांगितले होते.

या आरोपींना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मनातून या गुन्हेगारांची भीती कमी व्हावी व त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांना बेड्या घालून रस्त्याने फिरवले. कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सह पथकाने ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments