खळबळजनक...नगरमध्ये बेपत्ता उद्योजक दीपक परदेशी यांचा झाला खुन, बडतर्फ पोलिसासह दोघे गजाआड


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - शहरातून २४ फेब्रुवारी पासून बेपत्ता असलेले उद्योजक दीपक लालसिंग परदेशी (वय ६८, जि.. शाळेजवळ, परदेशी मळा, बोल्हेगाव) यांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत निंबळक बायपास रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीत १७ मार्चला आढळून आला आहे. त्यांचा एका बडतर्फ पोलिसाने त्याच्या एका सहकाऱ्याच्या मदतीने १० कोटींच्या खंडणीसाठी दोरीने गळा आवळून खुन केल्याचे पोलिस तपासात आढळून आले असून पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

किरण बबन कोळपे (वय ३८, रा.विळद,ता.नगर) असे या बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून कोळपे याने त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (रा.ब्राम्हणी ता. राहुरी) याच्या मदतीने परदेशी यांचा खुन केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हंटले आहे की, उद्योजक दीपक लालसिंग परदेशी हे २४ फेब्रुवारी पासून बेपत्ता झाले होते. याबाबत २५ फेब्रुवारीला तोफखाना पोलिस ठाण्यात मिसिंग ची तक्रार दाखल झाली होती. त्याचा तपास पो.हे.कॉ. दिनेश मोरे यांचेकडे देण्यात आलेला होता. त्यानंतर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या आदेशानुसार मिसींगचा पुढील तपास ३ मार्च पासून आमचेकडे वर्ग केल्याने बेपत्ता परदेशी यांचा शोध घेणेकामी माझेसह स.पो.नि. उज्वलसिंग राजपुत, पो.हे.कॉ. सुरज वाबळे, पो.हे.कॉ. दिपक जाधव, पो. कॉ. सतिष त्रिभुवन असे करत होतो.

सी.सी.टी.व्ही फुटेजने पोहचवले आरोपीपर्यंत

बेपत्ता परदेशी यांचा शोध घेत असताना या पथकाने २४ फेब्रुवारी रोजीचे नायरा पेट्रोल पंप, बोल्हेगाव, एक घर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोल्हेगाव येथील सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले होते. सदर सी.सी.टी.व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करताना दिपक परदेशी हे त्यांचे मोटार सायकल वरुन घराच्या दिशेने जात असल्याचे दिसुन आले. त्यामुळे दिपक परदेशी यांच्या पाठोपाठ येणाऱ्या वाहनांची बारकाईने पाहणी करता दुपारी २.३० ते ३ वाजे दरम्यानचे नायरा पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाची टाटा इंडीका कार परदेशी यांच्या पाठोपाठ जात असल्याचे दिसुन आले. परंतु त्याच रोडवरील पुढील एका घराचे सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाची इंडीका कार दोन ते तीन मिनीटे उशीराने येत असल्याचे दिसुन आले. तसेच सदर कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोल्हेगाव येथील सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये संशयास्पद रितीने बोल्हेगाव गावठाण जाणाऱ्या रोडने गेल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर इंडीका कारचा अधिक शोध घेतला असता इंडीका कार ही विळद येथील असुन सदरची कार ही किरण बबन कोळपे हा वापरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

ही माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किरण बबन कोळपे व त्याचा साथिदार सागर गिताराम मोरे, या दोघांना तपासकामी ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल व बारकाईने चौकशी केल्यावर त्या दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत मृतदेह निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जावून पाहणी केल्यावर त्यांना परदेशी यांचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आला.

आरोपींनी असा केला परदेशी यांचा खुन

उद्योजक परदेशी यांची आरोपीकिरण कोळपेशी ओळख होती. काही दिवसांपूर्वी परदेशी यांनी कोळपे यास बोलावून त्यांचे विळद गावातील काही लोकांकडे पैसे आहेत. ते वसूल करून देण्याचे काम सांगितले. याबाबत कोळपे याने त्याचा साथीदार सागर मोरे यास बोलावून घेत सांगितले. परंतु विळद गावातील लोकांकडून पैसे वसूल करणे अवघड असल्याने त्या दोघांनी परदेशी यांनाच उचलून त्यांच्याकडून अधिक पैसे मिळवायचा प्लान केला. त्यानुसार २४ फेब्रुवारीला दोघांनी इंडिका कारने परदेशी यांचा घरापर्यंत पाठलाग केला. त्यांना त्यांच्या घराबाहेरून कार मध्ये बसवून निंबळक च्या दिशेने व पुढे नगर मनमाड महामार्गावर घेवून गेले. त्यावेळी कार कोळपे चालवत होता.

परदेशी त्याच्या शेजारी पुढील सीट वर बसलेले होते तर सागर मोरे पाठीमागे बसलेला होता. ठरल्याप्रमाणे कोळपे याने परदेशी यांना १० कोटी रुपये मागितले व मोरे यास त्यांचे हात पाठीमागून धरून ठेवायला लावले. त्यावेळी परदेशी हे झटापट करायला लागले असता, अगोदरच कार मध्ये असलेल्या नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवळला. परदेशी यांनी झटापट करत कार चा दरवाजा उघडला असता कोळपे याने त्यांचे हात पाय दोरीने घट्ट बांधले. परदेशी यांनी पैसे न दिल्याने विळद घाटाजवळ सागर मोरे याने त्यांचा गळा दोरीने घट्ट आवळून त्यांना जीवे ठार मारले. त्यानंतर कोणाला कळू नये म्हणून त्याच दिवशी रात्री ८.३० च्या सुमारास दोघांनी परदेशी यांचा मृतदेह  निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकला.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाईल ट्रक मध्ये फेकला

परदेशी यांचा खुन करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर अगोदरच पोलिस खात्यात असलेल्या बडतर्फ किरण कोळपे याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी परदेशी यांचा मोबाईल सुरूच ठेवला. विळद घाटातून एमआयडीसी कडे येत असताना कोळपे याने त्यावरून काही मेसेज सेंड केले. त्यानंतर बोल्हेगाव फाट्याजवळ सागर मोरे याने परदेशी यांचा मोबाईल नगरच्या दिशेने चाललेल्या ट्रक मध्ये फेकला. तो ट्रक पुढे नागपूर येथे एमआयडीसीत गेला तेथे माल खाली करत असताना ट्रक चालकाला मोबाईल  दिसला. त्याने तो बंद केला व तेथून नगरला आल्यावर चालू केला. त्यावेळी पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी त्या ट्रक चालकाला ताब्यात घेवून चौकशी केली. मात्र त्याच्या कडून काहीच माहिती मिळाली नव्हती.

मात्र तब्बल २२ दिवसांनी पोलिसांनी या खुनाचा छडा लावत बडतर्फ पोलिस असलेला आरोपी किरण कोळपे व त्याचा साथीदार सागर मोरे यांना बेड्या ठोकल्या. पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांच्या फिर्यादी वरून दोघांवर खंडणीसाठी अपहरण आणि खुन असा गुन्हा दाखल केला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात

परदेशी यांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या (डी कंपोस्ट) अवस्थेत असल्याने त्या कुजलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची अत्याधुनिक सुविधा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नसल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी दुपारी उशिरा तो पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आरोपींनी ज्या ठिकाणी मृतदेह लपवून ठेवला होता. त्या निंबळक बायपासवर जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, तोफखान्याचे पो.नि. आनंद कोकरे यांच्या सह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली

आरोपी किरण कोळपे वर लागलाय मोक्का

आरोपी किरण बबन कोळपे हा २००८ मध्ये पोलिस दलात भरती झालेला होता. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. तर २०२३ मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिस दलातून बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. या शिवाय मोक्काच्या गुन्ह्यात त्याला जामीन मिळवून देणाऱ्या महिला वकिलाच्या घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मुळ कागदपत्र असा १लाख ९२ हजार ७०० रूपयांचा ऐवज बळजबरीने नेल्याचा गुन्हाही कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आहे. आता त्याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

0/Post a Comment/Comments