अहिल्यानगर (प्रतिनिधी) - निंबळक (ता. नगर) शिवारातील व्यावसायिक कुटुंबावर मोटारसायकलवर आलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी (२ मार्च) सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात व्यावसायिक राजेंद्र कोतकर यांच्यासह ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात १० ते १२ जणांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजेंद्र पोपट कोतकर (वय ४१, रा. कोतकर वस्ती, निंबळक) यांनी फिर्याद दिली आहे. निंबळक शिवारात कोतकर वस्ती येथे फिर्यादी राजेंद्र कोतकर यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानासमोर रविवारी (२ मार्च) सायंकाळी ४ मोटारसायकलवर संतोष धोत्रे (रा.नागापूर), मट्टस उर्फ अजय सोमनाथ गुळवे (रा. लामखडे चौक, एमआयडीसी), अमोल आव्हाड (पूर्ण नाव माहित नाही), अभी गायकवाड (रा.नागापूर), विशाल पाटोळे (रा.गणेश चौक, बोल्हेगाव), सुधीर प्रदीप दळवी (रा.नागापूर), आबा गोरे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), शरद जगन पाटोळे (रा.नागापूर) यांच्यासह ३ ते ४ अनोळखी इसम हातात तलवार, लोखंडी रॉड, लोखंडी घन, लाकडी दांडके घेवून आले.
या सर्वांनी फिर्यादी राजेंद्र कोतकर यांना तुझा भाऊ संदीप कोतकर उसने पैसे देत नाही, तो लय माजलाय असे म्हणत फिर्यादी सह संदीप कोंडीबा कोतकर, विलास बाळकृष्ण कोतकर मारहाण सुरु केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर तलवारीने वार केले. फिर्यादीचे चुलते कोंडीबा त्र्यंबक कोतकर व चुलती चंद्रभागा यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी मारून जखमी केले.
तसेच किराणा दुकानात पेट्रोल टाकून ते पेटवून दिले. फिर्यादी यांच्या खिशातील ५ हजारांची रोकड काढून घेतली. दुकानासमोर उभी असलेली विलास कोतकर यांची चारचाकी गाडीचे तोडफोड करून नुकसान केले.तेथे बराच वेळ या टोळक्याने धुडगूस घालून परिसरात दहशत निर्माण केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या पाचही जणांना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला करणारा संशयित संतोष धोत्रे व त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेत इतरांचा शोध सुरू केला. रात्री उशिरा राजेंद्र कोतकर यांनी दिलेल्या जबाबा वरून एमआयडीसी पोलिसांनी या १० ते १२ जणांच्या टोळक्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण, जाळपोळ शस्र अधिनियम अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गाव बंद ठेवून निंबळक ग्रामस्थांचा रास्ता रोको
निंबळक येथे किराणा दुकानदार कुटुंबावर टोळक्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सोमवारी (३ मार्च) गाव बंद ठेवत रास्ता रोको आंदोलन केले. या सर्व हल्लेखोरांना तातडीने शोध घेऊन अटक करावी तसेच एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या दहशतीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली.
निंबळक येथे कोतकर वस्तीवर असणाऱ्या गणेश किराणा दुकानावर टोळक्याने येऊन अचानक हल्ला केला. दुकानांमध्ये संदिप कोतकर यांची आई असताना टोळक्याने या दुकानातील तेलाचे डबे किराणा माल बाहेर फेकण्यास सुरुवात केली. यावेळी कोतकर यांची आई बाहेर आली असता तिला त्यांनी दमदाटी करून बाहेर ढकलले. दुकानही पेटवून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले, कोतकर कुटुंबातील सदस्यांना तलवार, लोखंडी रॉड, लोखंडी घन, लाकडी दांडके यांनी मारहाण करण्यात आली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Post a Comment