जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने केली नागरिकाला मारहाण



अहिल्यानगर (प्रतिनिधी) - मतदार यादीत जाणीवपूर्वक छेडछाड करून नागरिकांची नावे स्थलांतरित यादी टाकल्याने मतदानापासून वंचित राहिलेल्या व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणाऱ्या महादेव पांडुरंग गवळी (वय ३२, रा. इसळक, ता.नगर) यांना बीएलओ म्हणून काम पाहणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची घटना २५ मार्च रोजी घडली. या प्रकरणी गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केशव नाथा गेंरगे (रा. इसळक, ता. जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍याचे नाव आहे. इसळक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात काम करणारे केशव गेंरगे याची प्रशासनाने बीएलओ म्हणून नेमणूक केली होती. बीएलओ म्हणून काम करीत असताना त्याने मतदारयादीत जाणीवपूर्वक छेडछाड केली. मतदार यादीतील गवळी यांच्यासह अन्य १५ नागरिकांची नावे स्थालंतरित मतदार यादीत समाविष्ट केली. त्यामुळे त्यांच्यासह इतर नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. 

याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. प्रशासनाने चौकशी करून बीएलओ गेरंगे यांची नियुक्ती रद्द केली. त्याचा राग मनात धरून त्याने सुरूवातीला गवळी यांच्या वडिलांनाही धमकी दिली होती. २५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता गवळी हे दुचाकीवरून इसळक ग्रामपंचायती समोरून जात असताना त्याने दगड भिरकावून मारला. दुचाकी अडविली. शिवीगाळ करीत तू माझ्या वरिष्ठांना तक्रार करतोस का, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

0/Post a Comment/Comments