अहिल्यानगर (प्रतिनिधी) - विधानसभा 2024 च्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरिता इच्छुक महिला उमेदवाराकडून दीड लाख रुपये घेऊन तिकीट मिळवून न देता पैसे ही माघारी न देता फसवणूक केल्याची घटना ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 दरम्यान घडली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्या विरोधात मंगळवारी (दि.12 मार्च) नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक सौ. मंगल विलास भुजबळ (वय 42, रा.आगरकर मळा, स्टेशन रोड,अ.नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भुजबळ या विधानसभा निवडणुक 2024 लढविण्यासाठी नगर शहर विधानसभा मतदार संघातून इच्छुक होत्या. नगर शहर विधानसभेची जागा कॉग्रेस पक्षाला मिळावी यासाठी कॉग्रेसकडून महाविकास आघाडीमध्ये प्रयत्न केले जात होते.
26 ऑक्टोबर 2024 रोजी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. त्यात नगर शहर मतदार संघात राष्ट्रवादीने अभिषेक कळमकर यांचे नावही जाहीर केले. परंतु त्यांना ए बी फॉर्म त्या दिवशी दिलेला नव्हता. त्यामुळे ही जागा पुन्हा कॉग्रेसलाच सुटणार अशी शक्यता निर्माण झाली.
त्याचवेळी राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष बालराजे पाटील यांनी भुजबळ याचेशी संपर्क करुन सांगितले की, नगर शहराची जागा विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने जरी घोषित केली असली तरी ए बी फॉर्म दिला जाणार नाही. तसेच अभिषेक कळमकर यांचे नावाला नगर शहरातुन त्यांचे नावाला मोठा विरोध होत आहे. त्यामुळे ही जागा कॉग्रेसला सोडण्याचे ठरले आहे. विधानसभेची नगर शहराची जागा कॉंगेसला मिळणार आहे. परंतु ती जागा घेण्यासाठी तुम्हांला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला फंड द्यावा लागेल, त्यासाठी तुम्हांला टोकन म्हणून दीड लाख रुपये द्यावे लागतील, ही जागा काँग्रेसला सोडा असे कॉग्रेसच्या वरीष्ठांकडुन आदेश झाल्याने व जागा तुम्हांला सोडण्यासाठी सांगीतले आहे. त्यामुळे भुजबळ यांनी बालराजे पाटील यांनी दिलेल्या राजे जाधव उदयसिंह सत्यजित या नावाने असलेल्या अकाउंटवर टप्याटप्याने दीड लाख रुपये पाठवले.
त्यानंतर 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी राष्ट्रवादी शरद पवार गटाने अभिषेक कळमकर यांना ए बी फॉर्म दिल्याचे समजले. तेव्हा भुजबळ यांनी याबाबत बालराजे यास सांगितले असता त्याने सांगितले की 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत कळमकर यांचा अर्ज मागे घ्यायला लावून तुम्हाला पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करणार असल्याचे बालराजे यांनी सांगितले. परंतु तसे ही काही झाले नाही. त्यामुळे भुजबळ यांनी बालराजे पाटील यास त्यांचे दीड लाख रुपये मागितले असता तो आज देतो उदया देतो असे म्हणुन पैसे देण्यास टाळाटाळ करुन उडवाउडवीचे उत्तरे देवु लागला. तेव्हा आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे भुजबळ यांनी अखेर 12 मार्च रोजी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी बालराजे पाटील याचे विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment