कर्जतमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत आज गुढीपाडव्याला ठरणार ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी



कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत येथील महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कर्जत येथील श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडा नगरी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरूध्द मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील यांच्यात होणार आहे. तर माती विभागात वेताळ शेळके विरुद्ध प्रशांत जगताप यांच्यात सामना रंगणार आहे. कर्जत येथील कुस्ती स्पर्धेचा शनिवारी (दि.२९) चौथा दिवस होता. शनिवारी उपांत्य फेरीमधील लढती झाल्या. कुस्ती स्पर्धेचे संयोजक रोहित पवार हे यावेळी उपस्थित होते. उपांत्य फेरीचे सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.

पहिल्या उपांत्य फेरीच्या कुस्तीमध्ये नांदेडचा शिवराज राक्षे यांनी कोल्हापूरचा संग्राम पाटील याच्यावर सलग तीन वेळा भारांधाज डाव टाकत गुणांवर मात केली. त्यांच्या या डावाला संग्राम पाटील यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. व अंतिम फेरीमध्ये हे प्रवेश केला. यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष केला. कुस्ती सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटाच्या आत शिवराज राक्षे याने संग्राम पाटील याचा पराभव केला. गादी विभागातील दुसरी उपांत्य फेरीची कुस्ती मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील व सोलापूरचा शुभम माने यांच्यामध्ये झाली. दोन्हीही मल्ल ताकतीचे होते मात्र मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील यांनी या स्पर्धेमध्ये त्याचा सर्व अनुभव वापरून सोलापूरचा शुभम माने यास नामोहरण केले. शुभम मानेची कोणतीही चढाई यशस्वी होऊ दिली नाही. पहिल्या हाफ मध्ये पृथ्वीराज पाटील पाच गुणांनी आघाडीवर होता. दुसरा हा फ मध्ये त्यांनी ही आघाडी वाढवत दहा गुणांवर नेली आणि त्याचा चार विरुद्ध 11 गुणांवर विजयी झाला.

महाराष्ट्र केसरीमध्ये माती विभागासाठी सोलापूरचा वेताळ शेळके विरुद्ध सांगलीचा सनी मदने यांच्यामध्ये उपांत्य फेरीची लढत झाली. यामध्ये वेताळ शेळके यास सनी मदने यांनी चांगलीच लढत दिली. दोघांनीही एकमेकाला हप्ते भरण्याचा प्रयत्न केला. मात्र डाव आणि प्रति डाव याचा सुंदर मिलाप या कुस्तीमध्ये पहावयास मिळाला. दोन्हीही पहिलवान त्याचा वापर करत होते. अखेर गुणांच्या आधारावर वेताळ शेळके यांनी बाजी मारत सनी मदने याचा पराभव केला.

दुसरी मातीची उपांत्य फेरी मधील महाराष्ट्र केसरी कुस्ती अकोले येथील प्रशांत जगताप विरुद्ध नांदेडचा अनिल जाधव यांच्यामध्ये झाली. ही कुस्ती देखील चांगली चुरशीची झाली. दोन्हीही मल्लांनी एकमेकांवर डाव टाकण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले. प्रशांत जगताप यांनी तीनविरुद्ध बारा गुणांनी अनिल जाधव याचा पराभव केला.

0/Post a Comment/Comments