जमलेले लग्न मोडल्याने अपमानित झालेल्या तरुणीची गळफास घेत आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल



जामखेड (प्रतिनिधी) – लग्न जमले मात्र काही दिवसांनी मुलगा व मुलाच्या कुटुंबीयांनी या लग्नास नकार दिला. त्यामुळे जमलेले लग्न मोडल्याने २२वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलासह त्याच्या आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी मुलीचे वडील सतिष दादासाहेब सुरवसे (रा. डिसलेवाडी ता. जामखेड) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे हल्ली (रा. चिखली, कदळवाडी मोशी ता. चाकण जि. पुणे, मुळ रा. कर्जत) अनुजा दत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे (हल्ली. रा. कर्जत ता. कर्जत) या तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की मयत मुलगी मोनिका सतिष सुरवसे (वय २२, रा. डिसलेवाडी ता. जामखेड) हीचा विवाह कर्जत येथील मेंगडे कुटुंबातील मुलाशी जमला होता. मात्र लग्न जमल्यानंतर दि १८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२५ रोजी पर्यंत आरोपी मुलगा महेश दत्तात्रय मेंगडे याने मुलीला वेळोवेळी म्हणत होता की तु मला आवडली नाही, मला तु मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही असे म्हणुन मयत मोनिका हीस अपमानित केले.

तसेच मुलाची आई आरोपी अनुजा दत्तात्रय मेंगडे व मुलाचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे हे मुलीच्या वडीलांना म्हणत होते की तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभुन दिसत नाही. त्यामुळे माझ्या मुलीचे जमलेले लग्न मोडले व या कारणावरून माझ्या मुलीने मानसिक त्रासामुळे दि २७ मार्च रोजी दुपारी ११ते २ वाजण्याच्या कालावधीत डिसलेवाडी येथे रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे मुलीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मुलाकडील मुलासह आई वडिल अशा तिघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments