मुंबई - अभिनेता विकी कौशल 'छावा' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. बॉक्स ऑफिसवर अवघ्या ५ दिवसात या चित्रपटाने २०० कोटींकडे वाटचाल केली आहे. या चित्रपटातील विकीच्या भूमिकेचे जगभरात कौतुक होत असून प्रेक्षक आणि समिक्षकांकडूनही विकीच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली आहे. भूमिकेसाठी त्याने शिकलेली घोडेस्वारी, तलवारबाजी आणि लाठीकाठीचे प्रशिक्षण इ. विषयी भरभरुन कौतुक केले जातेय. महाराजांच्या भूमिकेसाठी या गोष्टी शिकणे साधी गोष्ट नव्हती, पण विकीने ते शिवधनुष्य पेलले आणि आज प्रेक्षकांचे प्रेम तो अनुभवत आहे.
दरम्यान विकीने नेमकी कशी मेहनत केली, त्याने घोडेस्वारी-तलवारबाजीचे प्रशिक्षण कसे घेतले, अॅक्शन सीक्वेन्सचा सराव कसा केला गेला इ. विषयीचा एक व्हिडिओ चित्रपटाची निर्मिती संस्था असणाऱ्या 'मॅडॉक फिल्म्स'ने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकीने घेतलेल्या प्रशिक्षणाची झलक पाहायला मिळाली.
व्हिडिओमध्ये विकी म्हणाला की, 'शूटिंगपूर्वी सहा महिन्यांची पूर्वतयारी झाली होती. मूलभूत गोष्टींपासून सुरुवात केली होती, घोड्याच्या स्वभावाची सवय केली गेली. घोडेस्वारीचा सराव काटेकोर पद्धतीने केला गेला. शस्त्रास्त्रांचा सराव त्याहून अधिक काटेकोरपणे केला. मग तलवारबाजी असो किंवा लाठी किंवा अॅक्शन ट्रेनिंगही अशाच पद्धतीने केले होते.' अभिनेत्याने म्हटले की दिवसाचे सात-आठ तास केवळ या सर्व गोष्टींचा सराव केला जायचा. विकी म्हणाला की, 'दररोज घरी गेल्यानंतर कुठेतरी नवीन जखम झाल्याचे दिसून यायचे. यानंतर जी शिस्त माझ्या आयुष्यात आली आहे, ती यापूर्वी कधीच नव्हती.'
'छावा' चित्रपटासाठी विकीने १०० ते १०५ किलोपर्यंत वजन वाढवले होते. त्याने याविषयीही या व्हिडिओमध्ये भाष्य केले. तो म्हणाला की, 'एक गोष्ट निश्चित होती की मला खूप वजन वाढवावे लागणार होते. मसल मासही चांगलेच वाढवावे लागले.' त्याच्या फिटनेसविषयी बोलताना विकीने आठवण सांगितले की, 'लक्ष्मण सरांनी (लक्ष्मण उतेकर) दिनू सरांना (दिनेश विजन) फोन करुन सांगितले होते की, मला माझा छावा सापडला'.
रम्यान शूटिंगदरम्यान विकीला सेटवरच गंभीर दुखापत झाली होती. विकीच्या फिटनेसवर काम करणाऱ्या तेजस लालवाणी या ट्रेनरने काही दिवसांपूर्वी ईटाइम्सशी बोलताना याविषयी माहिती दिली होती. छावामधील एका सीनदरम्यान विकीला दुखापत झाली, सुरुवातीला ही छोटीशी दुखापत असल्याचे वाटले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र, तो त्याचा हात हलवू शकत नव्हता, हात वाकवता येत नव्हता. यानंतर विकीला महिनाभर कोणतेच प्रशिक्षण घेता आले नव्हते अशीही माहिती तेजसने दिली होती.
विकीच्या भूमिकेचे कौतुक होत असतानाच चित्रपटातील रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग या कलाकारांनाही प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, नीलकांती पाटेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, आशिष पाथोडे या मराठी कलाकारांनीही उत्तम अभिनय केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.
Post a Comment