अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागात झालेल्या महाराष्ट्र केसरीचा किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांची कुस्ती आता न्यायालयाच्या वाटेवर दिसू लागली आहे. मी चितपट झालो नसताना मला पराभूत केले व लढतीचा रिव्ह्यू (व्हीडीओ) दाखवला नाही. त्यामुळे अन्याय झाल्याची भावना असून, मी न्यायालयात दाद मागणार आहे, असे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने जाहीर केले आहे. दरम्यान, त्याचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी एक कोटीचे चॅलेंज दिले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हीडीओ पाठवून त्यांच्याकडून शिवराज पराभूत झाल्याचे सिद्ध करा, असे आव्हान दिले आहे.
नगरच्या वाडियापार्क मैदानावर रविवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लढती झाल्या. गादी विभागातील दोन्ही अंतिम लढती वादग्रस्त ठरल्या. माती विभागात महेंद्र गायकवाड (सोलापूर) व साकेत यादव (परभणी) यांची अंतिम लढत झाली. त्यात महेंद्र गायकवाड विजयी होऊन त्याने महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. दुसरीकडे गादी विभागाची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ (पुणे) व शिवराज राक्षे (नांदेड) यांच्यात झाली. पृथ्वीराजने ढाक डावावर अवघ्या एका मिनिटात राक्षेला चितपट करून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. त्यानंतर मोहोळने महेंद्र गायकवाडचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.
एक कोटीची शर्यत लावतो : पोंगल
महाराष्ट्र केसरी कोणाला करायचे हे आधीच ठरले असावे. असोसिएशन वन मॅन शो आहे. एकच माणूस ती चालवतो आहे. सगळी खराबी सुरू आहे. शिवराजचा एकच खांदा खाली टेकला होता. त्यामुळे त्या लढतीचा व्हीडीओ दाखवण्याचा आमचा आग्रह होता, पण तो फेटाळला गेला, असा दावा शिवराजचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी केला. या कुस्तीचा व्हीडीओ देशाच्या कुस्ती संघटनेकडे व आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेकडे पाठवला जावा, त्यांनी शिवराज हरल्याचे स्पष्ट केले तर मी १ कोटी देण्यास तयार आहे, असे आव्हानही पोंगल यांनी दिले. दरम्यान, शिवराजच्या भावानेही निकालावर आक्षेप घेतला. शिवराज मागील १६ वर्षांपासून कुस्ती करतो. खेळात हार-जीत त्याला मान्य असते. त्याने पंचांना लाथ मारली हे ठीक आहे. पण या लढतीचा व्हीडीओ दाखवण्याची मागणी टाळताना त्याला पंचांकडून शिवीगाळ झाली व तेही व्हीडीओत आले आहे. अशी शिवीगाळ कोण सहन करणार? त्यामुळे पंचांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्याने केली.
Post a Comment