तर पंचांवरही कारवाई केली जाणार - कुस्तीगीर संघाच्या कार्याध्यक्षांनी दिला इशारा, म्हणाले...



मुंबई - महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांनी दिलेल्या निर्णयानंतर मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप केला. संतापलेल्या शिवराजने थेट पंचांच्या छातीत लाथ घातली. कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षेवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी जर आमच्याकडे पंचांच्या विरोधात तक्रार दिली तरी या संदर्भात समिती स्थापन करून पंचांवर देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती भोंडवे यांनी दिली. संदीप भोंडवे यांनी डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांच्या विधानावरही भाष्य केले.

संदीप भोंडवे म्हणाले की, काल पंचाना लाथ मारल्यानंतर आमचे पंच मॅटवरच आंदोलनाला बसले होते. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल व्हावेत, अशी संपूर्ण पंचाची इच्छा होती. पंच मॅटवरून उठत नव्हते. त्या ठिकाणी रामदास तडस आले, त्यांनी सर्व पंचांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाद विवाद होतच असतात. परंतु दोघांवर गुन्हे दाखल केले असते, तर त्यांना नोकरी मिळाली नसती. काही अडचणी आल्या असत्या. निकाल लागायला वेळ गेला असता. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. आम्ही सर्वजण कुस्ती संघाचे पदाधिकारी, कुस्ती संघाचे अध्यक्ष यांनी सर्वांनी चर्चा करून या दोन्ही पैलवानांवरती तीन-तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

...तर शंभर टक्के पंचांवर कारवाई केली जाईल

पंचांचा निर्णय चुकीचा होता का? या प्रश्नावर उत्तर देताना संदीप भोंडवे म्हणाले, मी शिवराज, त्याची आईची आणि कुटूंबातील सर्वांची प्रतिक्रिया ऐकली. पंचांवर देखील कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. शिवराज आणि त्याच्या कुटुंबीयांना पंचाविरोधात आक्षेप असेल, तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये साईड पंच किंवा मुख्य पंच असेल तर त्या सर्व गोष्टींची शहानिशा करावी लागेल. त्यानंतर एक कमिटी नेमली जाईल. त्यामध्ये जर पंच दोषी आढळले तर, शंभर टक्के पंचावर देखील कारवाई केली जाईल.

0/Post a Comment/Comments