शिर्डीत भिक्षेकऱ्यांमध्ये आढळले निवृत्त सहायक फौजदार, उच्चशिक्षित तरुणही :७५ भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शिर्डी - शिर्डीत प्रशासनाकडून भिक्षेकरी धरपकड कारवाईत एक सेवानिवृत्त सहायक फौजदारासह दुसरा उच्चशिक्षित आणि इंग्रजी बोलणारा तरुण, तर सून व लेकावरील झालेले कर्ज फेडण्यासाठी हातभार लागेल यासाठी आई भीक मागत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलिस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थान ॲक्शन मोडवर आले. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी व भाविकांनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध तसेच भाविकांना त्रास देणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली असून जवळपास ७५ भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.२०) सकाळपासून ताब्यात घेतले. यात १६ जिल्ह्यातील व ५ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश आहे. साई मंदिराजवळ भिक्षा मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर सकाळी शिर्डी पोलिस, साई संस्थान, शिर्डी नगरपंचायत यांनी संयुक्त कारवाई सुरू केली.
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भिक्षेकऱ्यांचा मोठा त्रास होत असल्याने आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत पडून असलेल्या भिक्षेकऱ्यांमुळे रहदारीलाही अडथळा निर्माण होत असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, साई संस्थांनचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली साई संस्थान नगरपंचायत शिर्डी पोलिसांनी आज सकाळपासून साई मंदिर परिसरात अनेक भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
या सर्व भिक्षेकऱ्यांना शिर्डी पोलिस ठाणे परिसरात बसवण्यात आले. या भिक्षेकऱ्यांना नाश्ता तसेच जेवण पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले. या सर्व भिक्षेकऱ्यांचे राहाता ग्रामीण रुग्णालयात मेडिकल करून न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाई सुरू केली.
पाच राज्यांतील भिक्षेकरी
कारवाईत अहिल्यानगर, मुंबई, छ.संभाजीनगर, नाशिक, पुणे, वाशिम, जळगाव, अकोला, बुलढाणा, नांदेड, जालना, बीड, सांगली, सोलापूर, यवतमाळ, भंडारा हे जिल्हे व कर्नाटक, मप्र, आंध्र, बिहार, प. बंगालचे भिक्षेकरी आढळले.
तो अस्खलित इंग्रजीत बोलला
आज पोलिस कारवाईत पकडण्यात आलेल्या भिक्षेकऱ्यांमध्ये १६ जिल्ह्यातील व ५ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश आहे. यात सून व लेकावर कर्ज झाले म्हणून त्यांनी कर्ज फेडण्यासाठी आईला इथे बसवल्याचे उघड झाले. याशिवाय मुंबईचा एक सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक याचाही भिक्षेकऱ्यात समावेश असून त्याच्या खात्यावर दहा ते पंधरा लाख रुपये असल्याचे कळते. तसेच भिवंडी येथील एक उच्चशिक्षित तरुणही या भिक्षेकऱ्यात आढळला त्याने आज प्रशासनाशी अस्खलित इंग्रजीत संवाद साधला.
Post a Comment