धनंजय मुंडे यांना पक्षीय पातळीवर मोठा दिलासा: आरोप सिद्ध होईपर्यंत कारवाई नाही



मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा अभय दिले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी राष्ट्रवादीच्या एका अनौपचारिक बैठकीत केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षीय पातळीवर मोठा दिलासा मिळाला आहे.

गत अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मीक कराडशी असणारे आर्थिक संबंध, कृषी घोटाळा आदी मुद्यांवर गंभीर आरोप होत आहेत. यामुळे त्यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. त्यातच करुणा मुंडे यांच्या प्रकरणात कोर्टाने ओढलेले ताशेरे यामु्ळेही राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली.

काय घडले राष्ट्रवादीच्या बैठकीत?

या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांप्रकरणी आपली भूमिका पुन्हा एकवार स्पष्ट केली. धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे ते म्हणाले. सूत्रांच्या माहितीनुसार, तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीला धनंजय मुंडे यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कृषी घोटाळ्याचा अहवाल येईपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी भूमिकाही यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी घेतल्याचे समजते. पक्षाच्या या भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांना पक्षीय पातळीवर मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.

अजित पवारांची अत्यंत सावध खेळी

उल्लेखनीय बाब म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप अत्यंत गंभीर आहेत. यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे. विरोधक या मुद्यावरून सातत्याने राष्ट्रवादीची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विश्लेषकांच्या मते, धनंजय मुंडेंवर एखादी कारवाई केल्यास त्याचा राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर मोठा परिणाम होईल. या प्रकरणी गटबाजी उफाळून येण्याचीही भीती आहे. त्यामुळे अजित पवार सध्या यासंबंधी अत्यंत सावध भूमिका घेत आहेत.

0/Post a Comment/Comments