दिल्ली विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त: पक्षाला केवळ 0.03 टक्के मते



दिल्ली - दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. दिल्लीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 30 उमेदवार उभे केले होते. या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पक्षाला या निवडणुकीत केवळ 0.03 टक्के मते मिळाली आहेत. एकाच टप्प्यात झालेल्या दिल्लीतील मतदानानंतर आज निकाल जाहीर झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत इंडिया ब्लॉकचा भाग असलेल्या पाच पक्षांनी देखील एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली. तर दुसरीकडे एनडीएचा भाग असलेल्या अजित पवार यांच्या पक्षानेही दिल्लीत स्वबळावर निवडणूक लढवली. यात पक्षाचे 30 ठिकाणी उमेदवार घोषीत केले हेाते. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) 30 जागा लढवल्या. मात्र, शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जागांवर भाजपला पाठिंबा दिला होता.

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील भाजप महायुती सरकारचा मित्रपक्ष आहे. अजित पवार हे स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांनी दिल्लीत भाजपशी युती केलेली नाही. राष्ट्रवादीला दिल्लीत आपले अस्तित्व निर्माण करता यावे यासाठी अजित पवार यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असे मानले जाते. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसचे वर्चस्व दिल्लीत दिसून येत असले तरी यात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला होता.

0/Post a Comment/Comments