नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील समृद्ध शेतकरी विकास गटाने विषमुक्त तूर पिकाचे उत्पन्न घेवून त्यापासून सेंद्रिय पद्धतीने तूर डाळ तयार केली असून या विषमुक्त तूरडाळीची शेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुरु केली आहे. त्याचा शुभारंभ यांनी तयार केलेली सेंद्रिय तुरदाळीची विक्री जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
समृद्ध शेतकरी विकास गट सारोळा कासार या गटातील १५ शेतकऱ्यांनी मिळून पाणी फाउंडेशन च्या फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यामध्ये या गटाने तूर पिकाची पेरणी केली होती. ही तूर पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आली. सदरची तूर ही विषमुक्त चाचणी करण्यासाठी पुणे येथील अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्या तपासणीत तूर पूर्णपणे सेंद्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या गटाने नंतर त्या तुरीची दाळ तयार केली आहे आणि या विषमुक्त तूरडाळीची शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री सुरु केली आहे. या विक्रीचा शुभारंभ अहिल्यानगर येथील कृषी अधिकारी कार्यालयात जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या तंत्र अधिकारी क्रांती मोरे, आत्मा विभागचे सहाय्यक तंत्र व्यवस्थापक उमेश डोईफोडे तसेच समृद्ध शेतकरी विकास गटातील सर्व सदस्य उपस्थित होते. ही तूर थेट शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीने विक्री केली जाणार असल्याचे गटाचे अध्यक्ष नवनाथ कडूस यांनी सांगितले.
Post a Comment