अहिल्यानगर (प्रतिनिधी) - तीन वर्षांपूर्वी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्या अपहृत मुलीला व तिच्या सहा महिन्याच्या बाळास ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २० मे २०२२ रोजी अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीस संगमनेर तालुक्यातील मेंगाळवाडी येथुन फुस लावुन पळवून नेले होते. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास न लागल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (एएचटीयु) यांचेकडे गुन्ह्यास भा.दं.वि. ३७० हे वाढीव कलम लावून तपास कामी वर्ग करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास वर्ग झाल्यानंतर पो.नि.राजेंद्र इंगळे व शाखेचे अधिकारी, अंमलदार हे वेगवेगळ्या मार्गाने माहिती घेऊन शोध घेत असताना अशी माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील अपहृत मुलगी ही संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथे रहावयास आहे. अशी माहिती मिळाल्याने एएचटीयू च्या पथकाने त्या ठिकाणी जावून अपहृत मुलीचा शोध घेतला असता ती मुलगी मिळून आली. पोलिसांनी त्या अपहृत मुलीस व तिचे ६ महिन्याचे बाळ यांना ताब्यात घेऊन पुढील तपास कामी संगमनेर तालुका पोलीसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधिक्षक गणेश उगले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार समीर सय्यद, अर्चना काळे, अनिता पवार, छाया रांधवन, चालक एस.एस. काळे यांनी केली आहे.
Post a Comment