अहिल्यानगर (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी नगरचे खासदार निलेश लंके यांच्यासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी ११ फेब्रुवारीला सकाळी संसदेबाहेर निदर्शने करत आंदोलन केले.
सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही.आजही सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकरी विविध वाहनांमधून सोयाबिन घेउन आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आठ दिवसांची मुदत वाढ देऊन काही होत नाही. किमान एक महिन्याची मुदत वाढ द्यायला हवी. शेतकऱ्यांना द्यायचे असेल तर मोकळया मनाने दिले पाहिजे. आठ दिवस मुदतवाढ दिल्यानंतर त्याची माहीती होण्यासाठी दोन दिवस जातात. मग चार पाच दिवसांत काय होणार आहे ? असा सवाल खा. लंके यांनी करत या मागणीची दखल न घेतल्यास संसदेबाहेर आंदोलन करण्याचा इशारा ३ -४ दिवसांपूर्वी दिला होता.
त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, नगरचे खासदार निलेश लंके, गडचिरोलीचे खासदार नामदेव कीर्तने, भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे, सोलापूरच्या प्रणिती शिंदे, बलवंत वानखेडे, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, मुंबईच्या खासदार वर्षाताई गायकवाड, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे व धाराशिव चे खासदार ओम राजे निंबाळकर सहभागी झाले होते.
सोयाबीन खरेदी झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होणार आहे. व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने सोयाबीन विकावे लागणार आहे. त्यामुळेच मंत्र्यांना पत्र देउन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. शेतकरी हा महत्वाचा आहे. तो अन्नदाता आहे. शेतकरी सुखी राहीला तर देश सुखी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांबरोबर राहीले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. असे खा. लंके यांनी सांगितले.
Post a Comment