नगर तालुक्यातील शासकीय जागेवरील अतिक्रमणांवर बुलडोझर, पक्की घरे केली जमीनदोस्त



नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे महसूल प्रशासनाने विरोध झुगारून काढली. पत्र्याचे शेड असलेली सुमारे ३० ते ३५ घरे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वडगाव गुप्ता परिसरात डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या मागील बाजूस शासकीय जमिनीवर ही बांधकामे होती. शुक्रवारी (दि.२१ फेब्रुवारी) सकाळीच प्रशासनाने कारवाई सुरू केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, एमआयडीसी पोलिस व अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रहिवाशांचा विरोध झुगारून जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड असलेली घरे जमीनदोस्त करण्यात आली.

दरम्यान, या रहिवाशांनी तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्याला उत्तर देताना सदर ३०० एकर जागा ही बँकवर्ड क्लास सोसायटीला शासनाने १९६४ च्या सुमारास दिलेली असल्याचा दावा रहिवाशांनी केला. तसेच, अनेक वर्षांपासून आम्ही येथे वास्तव्य करत आहोत. या जागेबाबत महसूल विभागाच्या सचिवांकडे सुनावणी सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले होते. 

सदर गटातील जागा सुमारे ९०० एकर आहे. त्यातील ३०० एकर बॅकवर्ड क्लास सोसायटीला देण्यात आली होती. इतर ६०० एकर जागेतील काही जागा वन विभागाची आहे. काही जागा विखे पाटील फाऊंडेशनला देण्यात आलेली आहे. ज्या जागेवर कारवाई झाली आहे, ती बँकवर्ड क्लास सोसायटीला दिलेली जागा नसल्याचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments