बनावट कागदपत्राच्या आधारे काढले कुणबी जात प्रमाणपत्र, नगरमध्ये एकावर गुन्हा दाखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कुणबी जातीचा दाखला काढणाऱ्याचा बनाव जात पडताळणी समितीच्या चौकशीत उघड झाला. या प्रकरणी आनंदा गंगाराम देवरे (रा. मोहडी उपनगर, धुळे) याच्याविरूध्द नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सावेडी येथील जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयातील दक्षता पथकाचे पोलिस निरीक्षक अजित नथ्थू सावळे यांनी फिर्याद दिली. आनंदा गंगाराम देवरे याने त्याचा मुलगा साई आनंदा देवरे याला भविष्यात शासकीय सवलतीचा आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने विरेंद्र आनंदा देवरे नावाने कुणबी जातीचा बनावट दाखला तयार केला. तो पडताळणी करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीच्या सावेडी येथील कार्यालयात प्रकरण दाखल केले होते.

या प्रकरणासोबत सादर केलेल्या कागदपत्रांबाबत जात पडताळणी समितीच्या सदस्यांना संशय आल्याने समितीने याबाबत सखोल तपासणी केली. त्यात सदर कुणबी जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आहे. त्यामुळे समितीने दक्षता पथकाचे पोलिस निरीक्षक अजित नथ्थू सावळे यांना आनंदा देवरे विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आदेशित केले. त्यानुसार त्यांनी १२ फेब्रुवारीला दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आनंदा देवरे विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३३६ (२) (३), ३४० (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments