सेवानिवृत्ती कार्यक्रमात आई व सासुची केली ग्रामगीता ग्रंथ तुला, 'या' अधिकाऱ्यांनी राबवला अनोखा उपक्रम



अहिल्यानगर - अहिल्यानगर  जिल्ह्यातील घोडेगाव चे सुपुत्र भाऊसाहेब  बऱ्हाटे हे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नांदेड येथून जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले. लहानपणापासूनच आईच्या संस्काराचे बाळकडू असलेले बऱ्हाटे यांनी आपला सेवापूर्तीचा सोहळा अतिशय वेगळ्या पद्धतीने भारतीय संस्कृतीला अनुसरून ज्यांच्यामुळे आज आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो. या मायेचे उपकार आपण आयुष्यभर फेडू शकणार नाही. याच भावनेतून आई आसराबाई बऱ्हाटे  व सासू हिराबाई आहेर यांच्या ग्रामगीता ग्रंथतुलेने भक्तीमय वातावरणात भजन कीर्तनाच्या निनादात आपल्या जन्म गावी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नांदेड येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांनी जो समाजापुढे आदर्श ठेवला आहे. प्रत्येक गाव हे सक्षम झाले पाहिजे. गावचा विकास झाला पाहिजे. हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्तीसाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे. त्यासाठी गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने  चला जाऊ गावाकडे, सार्वभौम ग्रामसभा याचे महत्त्व गावकऱ्यांना भजन व कीर्तनाद्वारे देण्यात आले. याप्रसंगी भाऊसाहेब बऱ्हाटे, सविता बऱ्हाटे, आसाराम बऱ्हाटे, रावसाहेब बऱ्हाटे, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई अंबाडे ,प्रा. अशोकराव ढगे ,शिवम बऱ्हाटे, सौरभ बऱ्हाटे,  घोडेगाव  पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई अंबाडे म्हणाल्या की आज एक आगळावेगळा सेवापुर्तीचा सोहळा पाहायला मिळाला आहे. आईची व सासूची ग्रामगीतात तुला करून बऱ्हाटे यांनी एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला असल्याचे ते म्हणाल्या.

याप्रसंगी भाऊसाहेब  म्हणाले की आई वडिलांचे आशीर्वाद मुळेच मी आज या पदावर पोहोचू शकलो त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकाराची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. ३२ वर्ष महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात नोकरी केली. शेतकऱ्यांची सेवा केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवा केली. आज सेवानिवृत्तीबद्दलआई आसराबाई व सासू हिराबाई यांची ग्रामगीता तुला करण्याचे मला भाग्य मिळाले.यातच मला भगवंताचे दर्शन घडले आहे. तुला केलेल्या ग्रामगीता प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी भेट म्हणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा. अशोक ढगे डॉ, राजेंद्र गंधे तसेच नांदेड येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments