प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेलेल्या नगर तालुक्यातील भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

 


नगर तालुका (प्रतिनिधी) - उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेलेल्या नगरमधील भाविकाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मच्छिंद्र पांडुरंग मेहेत्रे (वय ५२, सध्या रा.एम एस क्वाटर्स, चांदणी चौक, नगर, मूळ रा.अकोळनेर, ता.नगर) असे मयत भाविकाचे नाव आहे.   

मच्छिंद्र मेहेत्रे हे लष्कराच्या एम एस विभागात नोकरीला होते. ८ दिवसांपूर्वी त्यांचे नातेवाईकांसह ते प्रयागराज येथे कुंभमेळ्यानिमित्त दर्शनासाठी गेले होते. तेथे दर्शन झाल्यावर परतीच्या तयारीत असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी त्यांना तेथील रुग्णालयात दाखल केले. तेथे २ दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नगरला आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे तेथून रुग्णवाहिकेद्वारे त्यांना नगर कडे आणले जात असताना सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) सायंकाळी ६ च्या सुमारास नेवासा फाटा येथे आल्यावर त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना रुग्णवाहिकेद्वारे सायंकाळी ७ च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ.खेडकर यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबतची माहिती नगर तालुका पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत मच्छिंद्र मेहेत्रे यांच्या वर नगरच्या नालेगाव अमरधाम मध्ये मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ विवाहित मुली, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments