नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर सोलापूर महामार्गावर वाकोडी फाटा येथील साई श्रद्धा हॉटेल मध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांना एक १४ वर्षांची बांगलादेशी अल्पवयीन मुलगी आढळून आली आहे. पोलिसांनी तिच्या सह अन्य २ पश्चिम बंगाल राज्यातील महिलांची सुटका करत हॉटेलचालकाला अटक केली आहे. रविवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळी ५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
वाकोडी फाटा येथील साई श्रद्धा हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असून तेथे त्यासाठी परराज्यातील अल्पवयीन मुलींना ठेवण्यात आले असल्याची माहिती भिंगार कॅम्पचे स.पो.नि. जगदीश मुलगीर यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत कोतवाली पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप दराडे यांना माहिती कळवून त्यांच्या सह भिंगार कॅम्पचे उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, स.फौ. अकोलकर, हे.कॉ.पालवे, डोळे, लहारे, टकले, पो.ना.शेख आदींच्या पथकाने सायंकाळी ५ च्या सुमारास या हॉटेल वर छापा टाकला.
तेथे हॉटेल चालक शहानवाज वाहब आलम हुसेन (रा. तपोवन रोड, सावेडी) हा काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर हॉटेल मधील रूमची पाहणी केली असता त्यात पश्चिम बंगाल राज्यातील २ महिला आणि १ बांगलादेशी अल्पवयीन मुलगी आढळून आली. पोलिसांनी त्यांचा जबाब घेवून त्यांची सुटका केली. तर हॉटेल चालक शहानवाज वाहब आलम हुसेन याच्या विरुद्ध बीएनएस२०२३ चे कलम ९६ सह पोक्सो व पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
Post a Comment