अहिल्यानगर (प्रतिनिधी) - श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव चिखली येथील प्राचीन जागृत देवस्थान श्री. साकळाई देवीचा माघ पौर्णिमा यात्रोत्सव शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिखली कोरेगाव येथील साकळाई देवी एक जागृत देवस्थान समजले जाते. मंदिर पाचशे वर्षांपुर्वीचे असुन डोंगराच्या कुशीत वनराईने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात आहे. साकळाई देवीचे मुख्य ठाणे डोंगरावर असुन पायथ्याशी सुंदर हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे. त्यामध्ये देवीचा तांदळा असून जवळच पाण्याचा तलाव, पीर महाराज मंदिर आहे. या ठिकाणी वर्षभर भाविक दर्शनासाठी व पर्यटन म्हणून येत असतात. निघोज येथील मळगंगा देवीशी साकळाई देवीचे बहिणीचे नाते आहे असे आख्यायिका आहे.
मंदिर परिसरात विविध प्रकाराचे वनस्पती व झाडे लागवड करण्यात आलेली आहे. माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने कोरेगाव ते साकळाई मंदिरापर्यंत ४ कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच पुर्ण झालेले आहे. यात्रेसाठी विविध ठिकाणाहून भक्त दर्शनासाठी येत असतात.
यात्रेच्या दिवशी पहाटे ५ वाजता देवीचा अभिषेक, सकाळी ६ वाजता आरती होऊन नंतर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. संध्याकाळी ७ वा. देवीची पालखी छबिना मिरवणूक, देवीचे गाणे, नगारा वाद्य, फटाका, आतिषबाजी, लेझीम पथक असे विविध कार्यक्रम होणार आहेत. यात्रेत पशुहत्या होत नसुन देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो.
भाविकांच्या सोयीसाठी नगर व श्रीगोंदा येथून एस.टी. बस सुविधा केलेली आहे. यात्रेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. यात्रा कमिटीने यात्रेची पुर्ण तयारी केलेली असून सर्व भाविकांनी यात्रेस उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त बाळासाहेब साबळे, रामदास कानडे, राजु कानडे, सतिश फुलसौंदर, दादासाहेब साबळे, मुक्ताजी भालसिंग, बाळाससाहेब मोहारे व पुजारी बबनराव हिलगुडे यांनी केले आहे.
Post a Comment