पारनेर (प्रतिनिधी) - पोलिस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीने नगर शहर आणि उपनगरी भागात मागील आठवड्यात ३ ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांची लुट केल्यानंतर आता ग्रामीण भागातही ही टोळी सक्रीय झाली आहे. मोटारसायकल वर चाललेल्या ६० वर्षीय वृद्धाला रस्त्यात अडवून पोलिस असल्याची बतावणी करत हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पळवून नेल्याची घटना सुपा ते पारनेर रोडवर १२ फेब्रुवारीला दुपारी १ च्या सुमारास घडली आहे.
याबाबत बबुशा बाळू बोरुडे (वय ६०, रा. पुणेवाडी, ता.पारनेर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बोरुडे हे १२ फेब्रुवारीला दुपारी त्यांच्या पत्नी समवेत मोटारसायकलने सुपा ते पारनेर रोडने वडनेर हवेली कडे जात होते. कन्हेर ओहळ शिवारात दुपारी १ च्या सुमारास त्यांच्या पाठीमागून मोटारसायकल वर दोघे जण आले. त्यांनी मोटारसायकल आडवी लावत बोरुडे यांना थांबविले.
आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करून रात्री येथे काय घडले तुम्हाला माहित आहे का? अशी विचारणा करत तुम्ही काही दिवस गळ्यात कोणतेही मौल्यवान दागिने घालू नका. तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन काढा आणि तुमच्या गळ्यात असलेल्या उपरण्या मध्ये बांधून ठेवा. असे म्हणत त्यांना गळ्यातील चेन काढण्यास भाग पाडत उपरण्यामध्ये गुंढाळून ठेवण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने हात चलाखी करत ती चेन काढून घेतली व नंतर तेथून पोबारा केला.
काही वेळाने आपली फसगत झाली असून आपण लुटलो गेलो आहोत हे बोरुडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी नातेवाईक, कुटुंबियांशी संपर्क साधत पारनेर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोघा अनोळखी चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) २०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment