अहिल्यानगरच्या वाडियापार्क तालमीतील कुस्तीपटूचा बायपास रोडवर अपघाती मृत्यू, कुस्तीक्षेत्रावर शोककळा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करणाऱ्या कुस्ती पटूचा निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२४ फेब्रुवारी) पहाटे १.४५ च्या सुमारास घडली. मयूर कैलास तांबे (वय १९, रा.कर्जत, हल्ली रा. वाडिया पार्क तालीम, नगर) असे या कुस्तीपटूचे नाव आहे.

मयूर हा कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी कर्जतहून अहिल्यानगरमध्ये आला होता. वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करत तो तेथेच इतर सहकाऱ्यांच्या समवेत राहात होता. रविवारी (दि.२३) तो त्याच्या अन्य काही सहकाऱ्यांच्या समवेत मोटारसायकल वर राहुरी येथे कुस्तीच्या आखाड्यासाठी गेला होता. तेथून नगर कडे परतत असताना सोमवारी (दि.२४ फेब्रुवारी) पहाटे १.४५ च्या सुमारास निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर लामखडे पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला तो लघुशंकेसाठी थांबला. रस्त्याच्या खाली जावून पुन्हा त्याच्या मोटारसायकल कडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. 

या धडकेत तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन पसार झाले. त्याच्या पाठीमागून आलेल्या काही सहकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. मयत मयूर याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहिणी असा परिवार आहे. 

0/Post a Comment/Comments