अहिल्यानगर- लुटीसाठी कंटेनर चालकाचा गळा चिरून खुन, पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग करत दोघांना पकडले


नगर तालुका (प्रतिनिधी) - कर्नाटक येथून कंटेनर मध्ये सुमारे २८ लाख रूपयांचा ४२ टन हरभरा भरून तो खाली करण्यासाठी हरीयाणा येथे जात असलेल्या चालकाचा (ड्रायव्हर) दोघांनी धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. अनुपसिंह गोपाळसिंह बालेचा (वय ४३,रा. नोखा, जि. बिकानेर, राजस्थान) असे खून झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. नगर तालुक्यातील वाळुंज ते नारायणडोह जाणार्‍या बायपास रस्त्यावर नारायणडोह शिवारात ११ फेब्रुवारीला सकाळी ही घटना घडली.

दरम्यान, कंटेनर लुटीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. खून करणार्‍या दोघा संशयितांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साहेबा आनंदा गायकवाड व उस्वाल इंपिरिअल चव्हाण (दोघे रा. वाळुंज, ता. नगर) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुपसिंह यांनी त्यांच्याकडील कंटेनर मध्ये कर्नाटक येथून सुमारे २८ लाख रूपये किमतीचा ४२ टन हरभरा भरला होता. तो हरभरा त्यांना हरीयाणा येथे खाली करायचा असल्याने ते अहिल्यानगर मार्गे हरीयाणाच्या दिशेने जात होते. ते ११ फेब्रुवारीला  सकाळी नारायणडोह शिवारात आल्यानंतर त्यांना दोघांनी अडविले. त्यांच्या ताब्यातील २८ लाख रूपयांचा हरभरा व ४० लाख रूपयांचा कंटेनर असा ६८ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल लुटण्यासाठी दोघांनी अनुपसिंह यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून त्यांना कंटेनरच्या खाली ढकलून दोघे लुटारू कंटेनर घेऊन निघाले.

दरम्यान, कंटेनर घेऊन जात असताना त्यांनी विद्युत वाहक पोलला धडक दिली. तसेच ट्रक चालकाचा खून करून ट्रक लुटला जात असल्याचे स्थानिक नागरिकांच्या आले. त्यांनी हा सर्व प्रकार नगर तालुका पोलिसांना फोन करून सांगितला. ही माहिती मिळताच नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी गेल्यानंतर नागरिकांकडून समजले की दोघांनी कंटेनरच्या चालकास चाकूने मारले असून ते नारायणडोह रेल्वे ब्रीज खाली सदरचा कंटेनर सोडून रेल्वे पटरीने पळाले आहेत अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन ते अडीच किलोमीटर आरोपींचा पाठला करुन आरोपींना पकडले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरचा प्रकार लुटीच्या उद्देशाने केला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments