मोठी बातमी, श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन सुपा एमआयडीसीत करणार 1635 कोटी रुपये गुंतवून, कॅन निर्मिती प्रकल्प उभारणार



अहिल्यानगर (प्रतिनिधी) – नव्याने विकसित होत असलेल्या सुपा औद्योगिक वसाहतीत श्रीलंकेचा प्रसिद्ध गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याचा “सिलोन बेव्हरेजेस’ हा उद्योगसमूह १ हजार ६३५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडे ३५ एकर जागेची मागणी केली आहे. या उद्योगातून ४५५ जणांना रोजगार उपलब्ध हाेईल.

औद्योगिक विकास महामंडळाच्या किरकाेळ सुधारणा समितीच्या (मायनर माॅडिफिकेशन कमिटी-एमएमसी) बैठकीत या उद्योगसमूहाला भूखंड वितरित करण्याबाबत चर्चाही झाली. ‘एमएमसी’चा अहवाल उद्योग मंत्रालयाला मिळताच पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. एप्रिलपासून या उद्योगाच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी डी. आर. काकडे यांनी दिली.

सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक व मिनरल वॉटरच्या कॅन बनणार

सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक व मिनरल वॉटरच्या कॅन बनवण्यासह त्या भरून देण्याचे काम या कंपनीकडून केले जाते. काही दिवसांतच या उद्योगसमूहाला औद्योगिक विकास महामंडळाकडून भूखंड देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील रक्कम भरण्याचे पत्र देण्यात येणार अाहे. पहिल्या टप्प्यात २५ टक्के रक्कम भरल्यानंतर व दुसऱ्या टप्प्यात ७५ टक्के रक्कम भरण्यात येईल. त्यानंतर या उद्योगाला भूखंड वितरित केला जाणार आहे. या उद्योगसमूहाने १ लाख ४० हजार स्क्वेअर मीटर जागेची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

एप्रिलपासून बांधकामाला सुरुवात

या उद्योगसमूहाला देण्यात येणाऱ्या भूखंडाबाबत समितीची बैठक घेण्यात आली. या समितीने बैठकीतील मंजूर इतिवृत्त उद्योग मंत्रालयाला सादर केल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक विभागाकडून या उद्योगसमूहाला ऑफर लेटर दिले जाईल. त्यानंतर अलाइनमेंट लेटर मिळाल्यानंतर प्रत्यक्षात एप्रिलपासून बांधकामाला सुरुवात होईल. - डी.आर. काकडे, उपप्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

सर्वाधिक गुंतवणुकीचा पहिला प्रकल्प

सुपा औद्योगिक वसाहतीत ५ नोव्हेंबर २०१८ ला चीनच्या “कॅरियर मायडिया’ कंपनीचे भूमिपूजन झाले. त्यानंतर ८ वर्षांत ३३ उद्योग दाखल झाले. ३१ डिसेंबरअखेरपर्यंत ५ हजार १८६ कोटींची गुंतवणूक झाली. यातून १० हजार ५८४ जणांना रोजगार मिळाला. आतापर्यंत सर्वाधिक १ हजार ६३५ कोटींची गुंतवणूक करणारा “सिलोन बेव्हरेजेस’ हा उद्योग राहणार अाहे. यापूर्वी “कॅरियर मायडिया’ या उद्योगाने ८०० कोटींची गुंतवणूक केली.

0/Post a Comment/Comments