कैलास मानसरोवर यात्रा ५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार; भारत - चीन थेट विमान सेवाही सुरू होणार



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - देशात सध्या पवित्र महाकुंभचे पर्व सुरु आहे, तर दुसरीकडे भाविकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्त्वतः करार झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की भारत व चीनमधील संबंध सुधारण्यासाठी, ते अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य पावले उचलली जात आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.


 

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी २६-२७ जानेवारीला चीनच्या दौऱ्यावर होते. यावेळी चीनी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, ज्यात दोन्ही देशांनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वांग यी यांनी बीजिंगमध्ये विक्रम मिस्री यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान चीन –भारत संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्यावर भर दिला असल्याचं सांगितले.

जून २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही दशांमधील संबंध बिघडले आहेत. डोकलाममध्ये झालेल्या संघर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती. कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून भाविक उत्तराखंडच्या व्यास खोऱ्यातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येत होते.

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या बैठकीत ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांनी २०२५ च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, संबंधित यंत्रणा विद्यमान करारांनुसार यावर चर्चा करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दोन्ही देशांनी जलवैज्ञानिक डेटाची तरतूद पुन्हा सुरू करण्यावर आणि सीमापार नद्यांशी संबंधित इतर सहकार्यावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन तज्ञ स्तरावरील बैठक घेण्याचेही मान्य केले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने बांधलेल्या धरणाबाबत भारताच्या चिंता या बैठकीत मांडण्यात आल्या.

तसेच, उभय देशांमधील थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यावर तत्त्वतः सहमती झाली आहे. याबाबत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितलं की भारत व चीनमधील संबंध सुधारण्यासाठी लोककेंद्रित पावले उचलण्यास आम्ही दोन्ही पक्ष (दोन्ही देशांमधील सरकार) सहमत आहोत.

0/Post a Comment/Comments