जामखेड (प्रतिनिधी) – चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो कार
रस्त्यालगतच्या ५० फूट विहिरीत कोसळली. या अपघातात चालकासह कारमधील चौघांचाही
मृत्यू झाला. जामखेडमधील जांबवाडी शिवारात बुधवारी (१५ जानेवारी) सायंकाळी साडेचार
वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
अशोक विठ्ठल शेळके (२९), रामहरी गंगाधर शेळके (३५), किशोर मोहन पवार (३०,
सर्व रा. जांबवाडी) व वाहनचालक चक्रपाणी सुनील बारस्कर (२५, रा. राळेभात वस्ती, जामखेड) अशी मृतांची नावे आहेत.
जांबवाडीकडून हे चौघे तरुण बोलेरा (एमएच २३ एयू ८४८५) गाडीतून जामखेडकडे बुधवारी
सायंकाळी साडेचारच्या सुमारास येत होते. जांबवाडी शिवारातील मातकुळी रस्त्यालगत
चालक चक्रपाणी बारस्कर याचा बोलेरोवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या ५० फूट खोल
विहिरीत चौघेही गाडीसह कोसळले.
विहिरीत १५ फूट खोल पाणी
होते. या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
जवळच रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील मजूरही मदतीसाठी धावले.
जांबवाडी येथील तरुण, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही
विहिरीत पडलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. स्थानिक नागरिक व
मजुरांच्या मदतीने चारही तरुणांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.
रुग्णवाहिकेतून तातडीने
त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात
त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या चार मृत तरुणांपैकी दोघांची लग्ने
झाली असून त्यांना लहान मुले आहेत.
बीड जिल्ह्यातील पवनचक्की
कंपनीची कार
बीड जिल्ह्यातील पाटोदा
तालुक्यात एका पवनचक्की कंपनीचे काम सुरू आहे. या पवनचक्की कंपनीची ही कार असून
त्यावर चालक म्हणून चक्रपाणी सुनील बारस्कर हा कामाला होता. रात्री उशिरापर्यंत ही
कार विहिरीतच पडलेली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी
सांगितले.
Post a Comment