'या' व्यक्तींना आता तात्काळ मिळणार पंढरीच्या विठुरायाचे दर्शन, मंदिर समितीचा निर्णय



पंढरपूर : अंध, अपंग, अतिशय वृद्ध, आजारी, गर्भवती तसेच नवदाम्पत्यांना आता सावळ्या विठुरायाचे झटपट दर्शन मिळणार आहे. यासाठी त्यांनी येथील संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा, असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान माघी वारीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेत पुढील काही दिवस ‘ऑनलाइन’ आणि ‘व्हीआयपी’ दर्शन बंद राहणार असल्याचेही औसेकर महाराज यांनी सांगितले.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीला ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शिवाजी मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते. यानंतर समितीचे सह अध्यक्ष औसेकर महाराज यांनी पत्रकारांना माहिती दिली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर शहरातील स्थानिकांसाठी पहाटे सहा ते साडेसहा असा केवळ अर्धा तासाचा कालावधी होता. यात वाढ करून आता मंदिर समितीने पहाटे सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत स्थानिकांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासह रात्री साडेदहा ते अकरादेखील स्थानिकांना सोडण्यात येणार आहे. तर अंध, अपंग, नवदाम्पत्य, अतिशय वृध्द, आजारी, गर्भवती महिलांनादेखील झटपट दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहन औसेकर महाराज यांनी केले.

0/Post a Comment/Comments