मुंबई : मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे. मुंबई गुन्हे शाखेने कामाठीपुरा भागातून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यावेळी एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं.
मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई सुरु झाली आहे. एका एजंटलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दहा दिवसात ८१ बांगलादेशींना पकडण्यात आलं आहे. अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकूहल्ला करणारा हल्लेखोरही बांगलादेशी निघाल्याने कारवाईला वेग आला आहे. गुन्हे शाखेने एका एजंटसह चार महिलांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेला अर्ज केला होता. मात्र तिने कागदपत्रं कशी पुरवली, याचा तपास सुरु आहे.
पुण्यातही बांगलादेशी अटकेत
दुसरीकडे, पुण्यातही बांगलादेशी नागरिक सापडले असून त्यांच्याकडे बनावट कागदपत्रांचा ढिग सापडला आहे. यामध्ये आधार कार्ड, व्होटर कार्ड, डेबिट कार्ड अशा बनावट कागदपत्रांचा समावेश आहे. एहसान हाफिज शेख असं बांगलादेशा घुसखोराचं नाव असून त्याच्याकडे ८ पॅनकार्ड, १५ आधार कार्ड, २ मतदार ओळखपत्रं, २ वाहन परवाने आणि तीन पासपोर्ट सापडल्याची माहिती आहे. तो पुण्यातील स्वारगेट परिसरात महर्षीनगर येथे राहत असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. २००४ पासून त्याचं बेकायदेशीर वास्तव्य आहे.
दरम्यान, मागच्या वेळी मर्यादित वेळ होता, त्यामुळे आधार कार्डशी लिंक करता आलं नाही. आता खरोखर ज्या बहिणींना लाभ द्यायचा आहे, त्यांना लाभ मिळतोय का, याची पडताळणी सुरु असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Post a Comment