कोट्यावधीच्या ठेवी घेणाऱ्या सुपा येथील कंपनीची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी


नगर - कमीत कमी काळावधीत जास्तीत जास्त पैसा मिळण्याच्या हव्यासापोटी अनेक घोटाळे उघडकीस येत असताना, नवीन वर्षातील टोरेस कंपनीचा सर्वात मोठ्या घोटाळ्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. याच धर्तीवर सुपा येथील एका कंपनीत १० टक्के व्याज दर देण्याचे आश्‍वासन देत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या ठेवी घेतलेल्या असताना सदर कंपनी बंद पडण्याच्या अगोदर त्याची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले असून, या कंपनीची चौकशी न झाल्यास प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

 मेहेर कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, १०टक्के दराने ठेवीवर व्याज देण्याचे अमिष दाखविणाऱ्या सुपा (ता. पारनेर) येथील कंपनीने अनेक शेतकरी व कामगार वर्गांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी घेतलेल्या आहेत. सदर कंपनीचे डारेक्टर यांनी १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत आहेत. काही ठेवीदारांना १० टक्के दराने परतावा देण्यात आला. तर काही दिवसानंतर तो परतावा ६ टक्के व्याज दराने दिला जात आहे. प्रारंभी आश्‍वासन देऊन नंतर कमी दराने व्याज दिला जात असताना यामध्ये अनागोंदी व गैरकारभार असल्याचा आरोप रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. 

या प्रकरणामध्ये सर्वसामान्य नागरिकांची लुटमार सुरु असून, अत्यंत पुर्वनियोजित पध्दतीने सुपा, पारनेर जवळील जवळपासच्या गावातून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांच्या ठेवी घेण्यात येत आहेत. या कंपनीचा 1 हजार कोटीचा टर्न ओव्हर असून, याला शासनाची परवानगी, भरत असलेले टॅक्स याची देखील चौकशी होणे आवश्‍यक आहे.

महाराष्ट्रभरात शेअर मार्केटच्या नावाखाली व अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवून अनेक कंपन्या नागरिकांच्या ठेवी घेऊन पसार झाल्याचे उदाहरणे आहेत. नामांकित बँका, पतसंस्था ज्या पद्धतीने व्याज देत नाही, त्यापेक्षा जास्त व्याज दराने पैसे देण्याचा दावा करणाऱ्या या कंपनीची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी केली आहे. तर नगर जिल्ह्यात टोरेस कंपनीचा पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर असताना तात्काळ या प्रकरणाची पोलीसांनी दखल घेण्याचे त्यांनी म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments