अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगरच्या एमआयडीसी मध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घुण खुन केल्याची घटना शनिवारी (११ जानेवारी) सकाळी उघडकीस आली आहे. अश्विन मारुती कांबळे (वय ३२, रा. गणेश नगर, एमआयडीसी, मूळ रा. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) असे या खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नगर मनमाड रोड वरील बोल्हेगाव फाट्याजवळ असलेल्या ट्रॅक्टर शोरूम शेजारी पुलाच्या खालच्या बाजूस मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. ही माहिती मिळताच एमआयडीसीचे स.पो.नि. माणिक चौधरी हे पोलिस पथकासह घटनास्थळी गेले.
घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरु केल्यावर सदर मृतदेह हा अश्विन मारुती कांबळे याचा असल्याचे निष्पन्न झाले. तो एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करत होता. त्याचे पत्नीशी वाद झाल्याने तो मित्राच्या रूम वर राहात होता. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता तो मित्राशी बोलून घराबाहेर पडला होता.
त्यानंतर रात्रभर त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नव्हता. सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.त्याचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खुन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस अधिक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक लॅबचे तज्ञ आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
पोलिसांनी शव विच्छेदनाकरिता मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दुपारी उशिरा या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या खुनाचा तपास पोलिसांनी सुरु केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे. मयताचे कोणाबरोबर वाद होते का याचाही तपास केला जात आहे.
Post a Comment