नगर तालुक्यात शिक्षिकेचा पाठलाग करून केली छेडछाड, एकावर गुन्हा दाखल

 
नगर तालुका (प्रतिनिधी) - दुचाकीवरून रस्त्याने जाणाऱ्या तीस वर्षीय महिला शिक्षिकेचा पाठलाग करून अश्लील हातवारे करून तिचा विनयभंग केल्याची घटना नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा शिवारात गुंडेगाव कडे जाणाऱ्या रोडवर बुधवारी (दि.२९) सकाळी घडली.

याबाबतची माहिती अशी की ३० वर्षीय महिला शिक्षिका आपल्या मोपेडवर राळेगण म्हसोबा ते गुंडेगाव रस्त्याने जात असताना समोरून मोटार सायकल वरून आलेल्या नवनाथ कुंडलिक खोटे (रा. खोटे वस्ती, राळेगण म्हसोबा, ता. नगर ) याने तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लील हातवारे करून तिच्या मोपेडला कट मारला, आणि पाठलाग करून, तिची बोलण्याची इच्छा नसताना तिच्याशी परिचय करण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करत तिची छेड काढली. या आरोपीने या पूर्वीही वेळोवेळी या शिक्षिकेचा पाठलाग करून तिची त्याच्याशी बोलण्याची इच्छा नसतानाही बळेच बोलण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नवनाथ खोटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८ (१) ७९, ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments