अहिल्यानगर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर येथून पुणे येथे खासगी गाडीने जाताना २३ वर्षीय तरुणीस पाण्यात गुंगीचे औषध टाकून ती गुंगीत असताना तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना २६ जानेवारीला दुपारी नगर पुणे महामार्गावर चास शिवारातील एका लॉजवर घडली. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलिस ठाण्यात अहमद हसन सय्यद (रा. न्यु इंग्लिश स्कुल मार्ग, खंडाळा, ता. श्रीरामपुर) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी तो नगर तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की मूळची श्रीरामपूर तालुक्यातील व हल्ली नोकरी निमित्त पुणे येथे राहणाऱ्या २३ वर्षीय मुलीच्या वर्गात काही वर्षापूर्वी अहमद हसन सय्यद हा होता. त्यामुळे दोघांची ओळख होती, त्यांचे एकमेकांसोबत व्हॉटसॲप या सोशल मीडिया माध्यमातुन, तर कधी मोबाईल फोनवरुन बोलणे होत असते. ती तरुणी नातेवाईकांच्या लग्न समारंभाकरिता पुण्याहून श्रीरामपूर येथे आली होती. त्यानंतर २६ जानेवारी रोजी पुणे येथे जाण्यासाठी श्रीरामपूर बस स्थानकावर गेली. त्यावेळी तिला अहमद सय्यद याचा फोन आला. तो तिला म्हणाला की मी पण पुण्याला चाललो आहे. तु माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये चल असे म्हणल्याने तसेच तो ओळखीचा असल्याने ती त्याच्या स्वीप्ट कार (क्र. एम एच १२ जे एच २११२ ) मध्ये बसली.
ते राहुरीच्या पुढे आल्यानंतर तिला उलटी आल्यासारखे होऊ लागल्याने अहमद याने तिला त्याचे गाडीमध्ये असलेली पाण्याची बाटली दिली. त्यानंतर ते नगर पास करुन पुढे गेले असता तिला चक्कर येऊ लागली. त्यामुळे तिने अहमदला गाडी रोडच्या कडेला थांबवण्यास सांगितले. त्यावर अहमद म्हणाला की, आपण रोडवर न थांबता समोर असलेल्या लॉजवर जाऊ, तु तेथे फ्रेश हो त्यावर तिने त्याला नको म्हणाले परंतु त्याने आग्रह करुन मौर्य लॉजमध्ये नेले. त्यावेळी अहमदने तिला पुन्हा पिण्यासाठी पाणी दिले.
पाणी पिल्याने तिला आणखीन चक्कर येऊ लागल्यावर अहमद हा तिच्याशी लगट करू लागला. त्यास तिने विरोध केला मात्र गुंगीचा अंमल असल्याने तिचा विरोध तोकडा पडला व अहमद याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ती खूप रडली. परंतु त्याने तिचे काही ऐकले नाही. त्यानंतर त्या तरुणीने हा प्रकार तिच्या घरच्यांना फोन करून सांगितला व त्यांना चास येथे बोलावून घेतले. त्यानंतर पिडीत तरुणीने नातेवाईकासह कोतवाली पोलीस ठाणे गाठले.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अहमद हसन सय्यद याचेविरुध्द गुन्हा दाखल केला असून सदर घटना नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने सदर गुन्हा पुढील तपासासाठी नगर तालुका पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला आहे.
Post a Comment